प्रसाद गो. जोशी -देशांतर्गत तसेच जगभरातील उत्साहवर्धक घटनांमुळे शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. कमी झालेल्या किमतींचा फायदा घेत परकीय वित्तसंस्थांनी केलेली जोरदार खरेदी, तसेच युरोपमधील शेअर बाजारांमध्ये असलेली तेजी याचा लाभ मिळून गेले तीन सप्ताह घसरणारा शेअर बाजार वाढीला लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात अवघे तीन दिवस व्यवहार झाले. गुरुवारी महावीर जयंतीची, तर शुक्रवारी गुड फ्रायडेची सुटी असल्याने बाजार बंद राहिला. हे तीनही दिवस बाजारात तेजीचे राहिले. परिणामी सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक २८२६०.१४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत ८०१.५० अंश म्हणजेच २.९४ टक्के एवढी वाढ या निर्देशांकामध्ये झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २४४.८५ अंश म्हणजेच २.९४ टक्के वाढून बंद झाला. हा निर्देशांक ८५८६.२५ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकातील आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले. त्यामुळे या निर्देशांकाने वाढीमध्ये अन्य सर्व निर्देशांकांना मागे टाकलेले दिसून येते. हा निर्देशांक ६.७६ टक्क्यांनी वाढून १११४६ अंशांवर बंद झाला. मिडकॅप निर्देशांकामध्येही ३.७६ टक्क्यांनी वाढ झाली. हा निर्देशांक १०७५० अंशांवर बंद झाला.देशांतर्गत बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेली कपात ही आगामी काळामध्ये औद्योगिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरेल असा विश्वास बाळगत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. गेले तीन सप्ताह सातत्याने कमी होत असलेल्या निर्देशांकाने अनेक चांगल्या आस्थापना कमी किमतीत उपलब्ध असल्याने परकीय वित्तसंस्थांनीही खरेदीची संधी साधली. त्यातच युरोपमधील औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली वाढ युरोपसह अमेरिकेतील शेअर बाजारांना संजीवक ठरली आणि येथील बाजार वाढले. त्याचाही अप्रत्यक्ष प्रभाव भारतीय बाजारावर झाला.जाहीर झालेले भारताचे परकीय व्यापार धोरणही वाढीला हातभार लावणारे ठरले. येत्या पाच वर्षांसाठी म्हणजेच सन २०२० पर्यंत असलेले हे धोरण परकीय व्यापारामध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यावर भर देणारे आहे. परकीय व्यापारात वाढ झाल्यास त्यापासून भारतीय उद्योगजगत, तसेच अर्थव्यवस्थेलाही बळकटी प्राप्त होण्याची आशा आहे. फेब्रुवारी महिन्यात देशातील आठ पायाभूत उद्योगांच्या उत्पादनात झालेली घट चिंताजनक असली तरी बाजाराने त्याकडे दुर्लक्षच केले.
जोरदार खरेदीमुळे थांबली तीन सप्ताहांची बाजाराची घसरण
By admin | Updated: April 6, 2015 02:47 IST