Join us  

किरकोळ कर्जात तीन राज्यांचा वाटा ४० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:14 AM

देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी तब्बल ४० टक्के कर्ज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत वितरित झाले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली.

मुंबई : देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी तब्बल ४० टक्के कर्ज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत वितरित झाले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. विशेष म्हणजे या राज्यांचा देशाच्या एकूण लोकसंख्येतील वाटा फक्त २० टक्के आहे. म्हणजेच २० टक्के लोक राहत असलेल्या राज्यांत ४० टक्के कर्जवितरण झाले आहे.‘ट्रान्सयुनियन सिबिल’ या संस्थेने सोमवारी जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली. अहवालात म्हटले आहे की, २०१८ च्या मध्यातील म्हणजेच ३० जून रोजीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत देशातील एकूण किरकोळ कर्जातील ४० टक्के कर्ज दिले गेले आहे. या राज्यांत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्या राहत असताना एकूण कर्जधारक लोकसंख्येचे प्रमाण ३२ टक्के आहे.कर्ज दिले या कारणांस्तव...या कर्जात वाहन कर्ज, जुन्या गाड्यांसाठीचे कर्ज, गृहकर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, ग्राहक वस्तूंसाठीचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्डांवरील कर्ज आणि दुचाकीसाठींचे कर्ज यांचा समावेश होतो. अहवालात म्हटले आहे की, २0१७ च्या दुसऱ्या तिमाहीपासून २0१८ पर्यंतच्या काळात किरकोळ कर्जाचा ताळेबंद जवळपास २७ टक्क्यांनी वाढला आहे.देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी सर्वाधिक २0 टक्के कर्ज महाराष्ट्रात दिले गेले आहे. जूनमध्ये महाराष्ट्राचा किरकोळ कर्जाचा ताळेबंद (रिटेल क्रेडिट ताळेबंद) ५,५0,२00 कोटी रुपये होता. त्यापाठोपाठ तामिळनाडूचा ताळेबंद २,७७,४00 कोटी, तर कर्नाटकाचा २,७४,९00 कोटी रुपयांचा होता.

टॅग्स :अर्थव्यवस्थाबातम्या