Join us

सौर वीज उत्पादनात तिपटीने वाढ

By admin | Updated: March 13, 2017 23:56 IST

भारताने दहा हजार मेगावॉट सौर वीज उत्पादनाची क्षमता गाठली आहे. अवघ्या तीन वर्षांहून कमी काळामध्ये सौर वीज उत्पादनामध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : भारताने दहा हजार मेगावॉट सौर वीज उत्पादनाची क्षमता गाठली आहे. अवघ्या तीन वर्षांहून कमी काळामध्ये सौर वीज उत्पादनामध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.केंद्रीय वीजमंत्री पीयूष गोयल यांनी एका टिष्ट्वटद्वारे ही माहिती दिली आहे. केवळ तीन वर्षांमध्ये भारताची सौर वीज उत्पादन क्षमता तीन पटीने वाढल्याची बाब गौरवास्पद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २६ मे २०१४ रोजी भारताची सौर वीज उत्पादनाची क्षमता केवळ २६५० मेगावॉट होती ती आता दहा हजार मेगावॉटपेक्षा अधिक झाली आहे. ही घटना भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट करणारी आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.सरकारने सन २०२२ पर्यंत देशातील सौर वीज उत्पादन संचांद्वारे एक लाख मेगावॉट वीज उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे. या काळापर्यंत देशातील वेगवेगळ्या अक्षय ऊर्जा स्रोतांपासून १ लाख ७५ हजार मेगावॉट वीज उत्पादनाचे सरकारचे लक्ष आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष सरकार पार करू शकेल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला आहे.मध्य प्रदेशातील रेवा सोलर पार्कमध्ये कमी भांडवली गुंतवणूक आणि स्वस्त कर्ज याद्वारे सौर वीज उत्पादन केले जात आहे. येथील विजेचा लिलाव होऊन प्रतियुनिट रुपये २.९७ या दराने ही वीज विकण्याचे जाहीर झाले आहे. देशातील विजेचा हा सर्वात कमी दर आहे. सौर विजेच्या निर्मितीमुळे प्रदूषणाचा प्रश्न कमी होणार असून, विजेचे दरही कमी होण्याची शक्यता मोठी आहे. यामुळेच सरकारकडून सौर विजेच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनही दिले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)