Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातून हजारो मजूर परराज्यात

By admin | Updated: January 19, 2016 03:06 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून हजारो मजुरांनी कुटंबासह परराज्यात स्थलांतर केले आहे. कर्नाटक व अन्य राज्यात हे मजूर ऊस तोडण्याचे काम करीत आहेत.

मेहकर (बुलडाणा) : पोटाची खळगी भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून हजारो मजुरांनी कुटंबासह परराज्यात स्थलांतर केले आहे. कर्नाटक व अन्य राज्यात हे मजूर ऊस तोडण्याचे काम करीत आहेत. गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. मजुरांच्या हाताला कामे नसल्याने या मजुरांनी ऊस तोडणीच्या कामांसाठी परराज्याचा रस्ता धरला आहे. कर्नाटकसह इतर काही राज्यांमध्ये सध्या ऊस तोडणी हंगाम जोरात सुरू आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांची जोडी मिळून काम केले जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी पती-पत्नी ऊस तोडणी करीत आहेत. कामाच्या वेळेस पुरुष आजारी पडला तर अशावेळी त्यांच्या जोडीला असलेल्या महिलेलाच ऊस तोड व बांधण्याचे दोन्ही कामे पूर्ण करावी लागतात. ठेकेदाराकडून आगाऊ रक्कम घेतली असल्यामुळे या मजुरांना कामावरुन सुटीही घेता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील द्रुगबोरी, घाटबोरी, वरूड, भोसा, उमरा देशमुख, शेलगाव आदी गावांमधील मजूर कर्नाटकमध्ये ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. लोणार तालुक्यातील गंधारी, धायफळ, टिटवी, गोत्रा, नांद्रा, रायगाव, मढी, अजिसपूर, खुरमपूर, सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरागडलिंग, वाघाळा, जनुना तांडा, अंबेवाडी, आगेफळ तांडा, झोटिंगा, गारखेड आदी अनेक गावातील मजूर कामासाठी परराज्यात आहेत. (प्रतिनिधी)