मुंबई : येत्या एप्रिलपासून दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १४ टक्क्यांपासून ते १०८ टक्के इतकी घसघशीत वाढ होऊ घातली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी वाहन विम्याच्या प्रीमियमसंदर्भात विमा नियामक प्राधिकरणाने अर्थात ‘इरडा’ने प्रस्ताव तयार केला असून त्यात प्रीमियम वाढीची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास याचा सर्वाधिक फटका छोट्या गाड्यांना बसणार असून आलिशान गाड्यांच्या प्रीमियमच्या रकमेत मात्र तितकीशी वाढ होणार नाही. उपलब्ध माहितीनुसार, ज्या गाड्यांच्या इंजिनची क्षमता एक हजार सीसीच्या आतील आहेत, त्यांच्या प्रीमियममध्ये सर्वात अधिक वाढ होणार असून ही वाढ तब्बल १०७ टक्के इतकी आहे. तर एक हजार ते १५०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांच्या प्रीमियममध्ये ४४ टक्के, तर त्यावरील इंजिनक्षमता असलेल्या वाहनांसाठी २८.८ टक्के इतकी वाढ प्रस्तावित आहे. खाजगी गाड्या आणि मालवाहतूक किंवा व्यावसायिक गाड्यांच्या प्रीमियममध्येही मोठी वाढ प्रस्तावित असून ही वाढ १४ ते ८१ टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर आॅटोरिक्षाच्या विम्यामध्ये ७३ टक्के वाढ प्रस्तावित आहे. आॅटोरिक्षाच्या प्रीमियममध्ये एवढी मोठी वाढ झाल्यास त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. एकीकडे चार चाकी वाहनांच्या विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ सूचविताना दुचाकी वाहनांच्या प्रीमियममध्येही मोठी वाढ प्रस्तावित केली आहे. ज्या दुचाकी वाहनांची इंजिन क्षमता ७५ सीसीच्या आत आहे, अशा वाहनांकरिता १४ टक्के तर १०० ते ३५० सीसी दरम्यान इंजिन क्षमतेच्या वाहनांकरिता ३२ टक्के आणि ३५० सीसी इंजिनक्षमतेवरील वाहनांसाठी ६१ टक्के इतकी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार
By admin | Updated: March 12, 2015 00:21 IST