Join us  

कार आणि दुचाकींचा थर्ड पार्टी विमा १६ जूनपासून महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 3:48 AM

विमा हप्त्यात १२ ते २१ टक्के वाढ; ई-रिक्षासाठी मात्र बदल नाही

नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) वाहनांच्या काही श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटार विमा हप्त्यात २१ टक्क्यांनी वाढ केल्याने १६ जूनपासून कार आणि दुचाकी वाहनांचा विमा महाग होणार आहे.

सर्वसाधारणपणे थर्ड पार्टी विमा हप्ता दरांत एक एप्रिलपासून सुधारणा केली जाते. तथापि, २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी नवीन दर १६ जूनपासून लागू होतील. १,००० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या कारसाठी थर्ड पार्टी विमा हप्त्यात १२ टक्के वाढ करण्यात आल्यानेविमा हप्ता १,८५० वरून २,०७२ रुपये होईल. त्याचप्रमाणे १ हजार आणि दीड हजार सीसीच्या वाहनांसाठी विमा हप्ता १२.५ टक्के वाढविण्यात आल्याने ३,२२१ रुपये झाला आहे.

दीड हजार सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठी थर्ड पार्टी विम्याचा हप्ता वाढविण्यात आलेला नाही. तो ७,८९० रुपये कायम ठेवण्यात आला आहे. दुचाकी वाहनांत ७५ सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा हप्ता १२.८८ टक्क्यांनी वाढवून ४८२ करण्यात आला आहे. ७५ ते १५० सीसी दुचाकी वाहनांसाठी विमा हप्ता ७५२ रुपये करण्यात आला आहे.

१५० ते ३५० सीसी क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्त्यात सर्वाधिक २१.११ टक्के वाढ करण्यात आल्याने विम्यासाठी १,१९३ रुपये मोजावे लागतील. ३५५ सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्त्यात बदल करण्यात आलेला नाही. मालवाहू खाजगी आणि सार्वजनिक वाहनांसाठीही थर्ड पार्टी विमा हप्त्यांत वाढ करण्यात आली आहे. ई-रिक्षासाठी मात्र हप्त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शालेय बससाठी थर्ड पार्टी विमा हप्त्यात वाढ करण्यात आली आहे.