नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची नक्कल करून काही बनावट नोटा बाजारात आल्याच्या घटना उघडकीस आल्या असल्या तरी दोन हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा कोणताही विचार नाही, असे सरकारने बुधवारी स्पष्ट केले.दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या जाणार असल्याच्या जोरदार अफवा बाजारात आहेत. तेव्हा सरकार खरंच या नोटा रद्द करणार आहे का, या काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या जात आहेत. बाजारातील अफवांवर विश्वास ठेवू नका.रिजिजू म्हणाले की, दोन हजारांच्या बनावट नोटा प्रामुख्याने गुजरात व पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या आहेत. परंतु या बनावट नोटा ओळखणे कठीण असल्याचा त्यांनी इन्कार केला. मंत्री म्हणाले की, नोटाबंदीनंतर लगेचच्या काळात दोन हजारांच्या ज्या बनावट नोटा आल्या, त्या अगदीच हलक्या प्रतीच्या कागदावर छापलेल्या होत्या. नंतर त्यांच्या कागदाची प्रत बरीच सुधारली. तरीही या बनावट नोटा सहजपणे ओळखल्या जाऊ शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)>२३ हजार नोटा जप्तसरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या २३,०५५ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.त्यापैकी ३७८ बनावट नोटा सीमा सुरक्षा दलाने आसाम व पश्चिम बंगालमधून तर राष्ट्रीय तपासी यंत्रणेने २२,६७७ बनावट नोटा गुजरात व प. बंगालमधून हस्तगत केल्या आहेत.
दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याचा विचार नाही
By admin | Updated: April 6, 2017 00:22 IST