Join us  

पाच अब्जाधीशांची संपत्ती दुप्पटआर्थिक विषमता वेगाने वाढली; ऑक्सफॅमचा सरकारी धोरणांवर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:13 AM

सरकारच्या धोरणांमुळे उद्योगसमूहांची नफेखोरी आणि एकाधिकारवाद वाढून जगात असमानता वाढल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. 

दावोस : जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीशांची संपत्ती २०२० नंतर दुपटीपेक्षा अधिक वाढली, तर ५ अब्ज जण गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत, असे ऑक्सफॅमने वार्षिक विषमता अहवालात म्हटले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या येथे सुरू होत असलेल्या वार्षिक बैठकीच्या पहिल्याच दिवशी ऑक्सफॅमने हा अहवाल जारी केला. सरकारच्या धोरणांमुळे उद्योगसमूहांची नफेखोरी आणि एकाधिकारवाद वाढून जगात असमानता वाढल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. 

२०२० नंतरश्रीमंतांच्या संपत्तीत सरासरी ३.३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. जागतिक अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना तसेच कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेढले असताना श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र भर पडल्याचे सांगत ऑक्सफॅमने गंभीर चिंता व्यक्त केली. शेअरधारकांना जोरदार परतावा मिळाला पण कोट्यवधी जणांना वेतनकपातीचा सामना करावा लागला आहे, असेही यात नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)

१.४ कोटी डॉलर्सने तासाला वाढली संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत पाच व्यक्तींच्या संपत्तीमध्ये प्रतितासाला १.४ कोटी डॉलर्स या वेगाने भर पडली आहे. २०२० नंतर त्यांची संपत्ती दुपटीने वाढून ४०५ अब्ज डॉलर्सवरून ८६९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास दशकभरात जगाला पहिला खरबपती मिळू शकेल आणि गरिबीची नायनाट होण्यासाठी पुढील २२९ वर्षे लागतील, असे अहवालात म्हटले आहे. 

अब्जाधीशांवर अधिक कर आकारा१९४८ साली देशांमध्ये ४८ टक्के इतका कॉर्पोरेट कर लावला जात असे. २०२२ मध्ये तो घटून केवळ २३.१ टक्केवर आला आहे, असे अहवालात म्हटले आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीवर जादा कर लावल्यास या अहवालात सुचवले आहे. यामुळे जगभरातील सरकारांना १.८ खरब डॉलरचा महसूल मिळू शकतो असेही म्हटले आहे.

सरकारच्या तिजोरीचेही नुकसानजगभरात सध्या खासगी क्षेत्रावरील कर कमी केले जात आहेत. अपारदर्शकता वाढत आहे. सोयीची धोरणे राबवावी यासाठी मोठे उद्योग लॉबिंग करतात. यातून सरकारच्या तिजोरीचेही नुकसान होत आहे. या पैसा गरिबांच्या कल्याणावर खर्च करता आला असता, असे अहवालात म्हटले आहे. 

आपण सगळे विषमतेच्या दशकाची सुरुवात पाहत आहोत. उद्योगसमूहांची नफेखोरी आणि एकाधिकारवाद यामुळेच जगात असमानता वाढत आहे. सर्व मार्गाने नफा उकळण्यासाठी अब्जाधीश प्रयत्न करताना दिसत आहेत. - अमिताभ बेहर, अंतरिम कार्यकारी संचालक, ऑक्सफॅम

टॅग्स :व्यवसाय