Join us  

निर्यातीमध्ये दहा टक्के घट; जुलै महिन्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 1:07 AM

आयातीमध्येही घट; व्यापार तूट झाली कमी

नवी दिल्ली : सलग पाचव्या महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये १०.२१ टक्क्यांनी घट झाली आहे. याबरोबरच आयातही कमी झाल्याने आयात - निर्यात व्यापारातील दरी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जुलै महिन्यातील देशाच्या आयात निर्यातीबाबतची आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार जुलै महिन्यात देशाची निर्यात १०.२१ टक्क्यांनी घसरून २३.६४ अब्ज डॉलरवर आली आहे. देशातून होणारी पेट्रोलियम पदार्थ, चामडे व चामड्याच्या वस्तू, तसेच रत्ने आणि दागिने यांची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने एकूण निर्यातीमध्ये घट झाली आहे.याच कालावधीत देशाच्या आयातीमध्येही २८.४ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलै महिन्यात देशात २८.४७ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करण्यात आली. देशाची आयात तसेच निर्यात या दोन्हीमध्ये घट झाली असल्याने व्यापारातील तूटही आता ४.८३ अब्ज डॉलरवर आली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातच व्यापारातील तूट १३.४३ अब्ज डॉलर होती. देशाच्या इंधन आयातीमध्ये ३१.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र याच काळात सोन्याच्या आयातीमध्ये मात्र ४.१७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे. एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांमध्ये निर्यात ३०.२१ टक्क्यांनी घसरूण ७४.९६ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्याचबरोबर या काळात आयातीमध्येही ४६.७ टक्क्यांनी घट झाली असून, देशात ८८.९१ अब्ज डॉलरच्या वस्तू आल्या आहेत. या काळात आयात निर्यात तफावत १३.९५ अब्ज डॉलर एवढी राहिली.घाऊक मूल्यावर आधारित चलनवाढीमध्ये घटभाजीपाला व अन्य खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी देशातील घाऊक मूल्यावर आधारित चलनवाढीमध्ये ०.५८ टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याबाबतचा अहवाल शुक्रवारी जाहीर केला. चलनवाढीच्या दरात घट होण्याचा हा सलग चौथा महिना आहे. जून महिन्यात चलनवाढीचा दर- १.८१ टक्के असा होता.जुलै महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीमध्ये ८.२० टक्के अशी प्रचंड वाढ झालेली दिसून आली. डाळीचे दर १०.२४ टक्क्यांनी तर बटाटा ६९.०७ टक्क्यांनी वाढलेला आहे. अंडी, मांस, मासे यांच्या किमती वाढल्या असल्या तरी कांदा, फळे तसेच इंधन यांच्या दरामध्ये मात्र घट झाल्याचे अहवालात दिसून येत आहे.