Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारचे ग्राहक ९६.४२ कोटींवर

By admin | Updated: January 8, 2015 23:48 IST

देशात दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये ९६.४२ कोटींवर गेली आहे. यात नवे ग्राहक जोडण्यात आयडिया सेल्युलरने बाजी मारली आहे.

नवी दिल्ली : देशात दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये ९६.४२ कोटींवर गेली आहे. यात नवे ग्राहक जोडण्यात आयडिया सेल्युलरने बाजी मारली आहे. दूरसंचार नियामक ट्रायने आज यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली.ट्रायच्या आकडेवारीनुसार, ‘भारतात दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबर २०१४ अखेरीपर्यंत वाढून ९६.४२ कोटींवर गेली आहे. आॅक्टोबर २०१४ अखेरीपर्यंत ही संख्या ९६.२६ कोटी होती. यानुसार ग्राहकसंख्येत ०.१६ टक्का मासिक दराने वाढ नोंदली गेली.’नोव्हेंबर २०१४ च्या अखेरीपर्यंत मोबाईल ग्राहकांची संख्या वाढून ९३.७ कोटीवर पोहोचली. आॅक्टोबरमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या ९३.५३ कोटी एवढी होती. दूरध्वनी ग्राहकांची संख्या अर्ध्या टक्क्याने घटून २.७१ कोटीवर आली. ही संख्या आॅक्टोबरमध्ये २.७२ कोटी होती. नोव्हेंबरमध्ये जवळपास ८८ टक्के मोबाईल ग्राहक सक्रिय असल्याचे दिसून आले. आयडिया सेल्युलरने मोबाईल सेवांतील वाढीचे नेतृत्व केले.कंपनीने या काळात २५.४ लाख नवे ग्राहक जोडले, यामुळे आयडियाची एकूण ग्राहक संख्या १४.७९ कोटीवर पोहोचली. यादरम्यान, व्होडाफोनने २३.३ लाख नवे ग्राहक बनविले, तर एअरटेलने २० लाख, एअरसेलने ९.५३ लाख, टाटा टेलीने ७.८५ लाख, युनिनॉरने १.९३ लाख व व्हिडिओकॉनने १.५१ लाख नवे ग्राहक जोडले. सरकारी कंपनी एमटीएनएलने १९,२३० नवे मोबाईल ग्राहक तयार केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)३६ लाखांनी आॅपरेटर बदललेदुसरीकडे रिलायन्स कम्युनिकेशन्सचे निष्क्रिय ग्राहक रद्द केल्याने कंपनीला ४२ लाख मोबाईल ग्राहक गमवावे लागले. ट्रायच्या मते, ३६.४ लाख ग्राहकांनी आपले दूरसंचार आॅपरेटर बदलण्याची अर्ज केला. यामुळे एमएनपी अर्जांची संख्या नोव्हेंबर अखेरीपर्यंत वाढून १३.९४ कोटीवर पोहोचली आहे.