Join us

टाटांच्या विमानाचे आॅक्टोबरमध्ये टेक आॅफ

By admin | Updated: August 12, 2014 03:25 IST

टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या नव्या विमान कंपनीच्या उड्डाणाचा मुहूर्त आॅक्टोबरमध्ये निश्चित मानला जात

नवी दिल्ली : टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या नव्या विमान कंपनीच्या उड्डाणाचा मुहूर्त आॅक्टोबरमध्ये निश्चित मानला जात असून सप्टेंबरपर्यंत कंपनीच्या ताफ्यात पहिले विमान दाखल होणार असल्याची माहिती कंपनीने सोमवारी जाहीर केली. कंपनीच्या विमानसेवेचे नामकरण ‘विस्तार’ असे करण्यात आले आहे.कंपनीचे अध्यक्ष प्रसाद मेनन यांनी सांगितले की, नवी विमान कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आॅक्टोबरच्या आसपास कंपनी आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होईल, अशी आशा आहे. आगामी पाच वर्षांत कंपनीच्या ताफ्यात २० विमाने असतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून, यापैकी किमान सात विमाने ही ए-३२० जातीची अत्याधुनिक विमाने असतील. पहिले विमान सप्टेंबरमध्ये कंपनीच्या ताब्यात येणे अपेक्षित आहे. ही सर्व विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पाच प्रमुख शहरांना जोडण्याचा विचार असून हा विस्तार ११ प्रमुख शहरांपर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये मुंबई, बंगळुरू, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, जम्मू, श्रीनगर, पाटणा आणि चंदीगड आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)