Join us  

सात महिन्यांत चहा निर्यातीत १४ टक्के घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:43 AM

जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीत १००.७८ दशलक्ष किलो चहाची निर्यात भारताने केली. २०२० च्या समान अवधीत ११७.५६ दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्यात आली होती.

कोलकाता : २०२१ च्या पहिल्या सात महिन्यांत भारताच्या चहा निर्यातीत मागील वर्षाच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत तब्बल १४.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतीय चहा महासंघाने (आयटीए) ही माहिती जारी केली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीत १००.७८ दशलक्ष किलो चहाची निर्यात भारताने केली. २०२० च्या समान अवधीत ११७.५६ दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्यात आली होती. सीआयएस ब्लॉकमधील देशांना सर्वाधिक २४.१४ दशलक्ष चहा निर्यात करण्यात आला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यातही घटली आहे. गेल्या वर्षी या देशांना या अवधीत ३०.५३ दशलक्ष किलो चहा निर्यात झाला होता. इराणला १२.६३ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली. गेल्या वर्षी हा आकडा २१ दशलक्ष किलो होता. चीनला झालेली निर्यातही ५.७४ दशलक्ष किलोवरून ३.२९ दशलक्ष किलोवर घसरली आहे. ब्रिटनला झालेली निर्यातही घसरून ३.१२ दशलक्ष किलोंवर आली आहे. २०२१ मध्ये केवळ अमेरिका आणि संयुक्त अरब आमिरात या दोनच देशांना झालेल्या चहा निर्यातीत वाढ झाली आहे.