Join us  

TCS नं शब्द पाळला, हजारो फ्रेशर्सची होणार भरती; ११ लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 3:26 PM

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) पुन्हा फ्रेशर्सची भरती सुरू केली आहे. त्यामुळे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) पुन्हा फ्रेशर्सची भरती सुरू केली आहे. त्यामुळे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागणीत घट झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी भरती थांबवली होती. टीसीएसनं २०२४ बॅचच्या बीटेक, बीई, एमएससी आणि एमएस बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीच्या करिअर पेज वेबसाइटनुसार, नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे आणि त्यांची टेस्ट २६ एप्रिल रोजी होणार आहे. 

ही फर्म निन्जा, डिजिटल आणि प्राइम या तीन श्रेणींमध्ये भरती प्रक्रिया राबवत आहे. निन्जा श्रेणीमध्ये निरनिराळ्या रोल्ससाठी ३.३६ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर केलं जात आहे, तर डिजिटल आणि प्राइम श्रेणींमध्ये, वार्षिक पॅकेज अनुक्रमे ७ लाख रुपये आणि ९-११.५ लाख रुपये आहे. कंपनीनं किती लोकांची भरती केली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 

यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात, २०२४-२५ या आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टीसीएसची प्रतिस्पर्धी कंपनी इन्फोसिसनं सध्या कोणतीही कॅम्पस भरती करण्याची योजना नसल्याचं जानेवारी महिन्यात म्हटलं होतं. मात्र, फेब्रुवारीमध्ये आलेल्या बातम्यांनुसार कंपनीनं काही पदांवर नियुक्त्या केल्या होत्या.

टॅग्स :टाटानोकरी