नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आयकर भरणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा दिला असून, आयकर रिटर्नच्या चौकशीच्या निमित्ताने आता आयकर अधिकारी करदात्यांना घाबरवू शकणार नाहीत. आयकर तपासाची संपूर्ण प्रक्रियाच आता आॅनलाईन करण्यात आली आहे. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप आता शक्यच राहिलेला नाही. आयकरदात्याने योग्य रिटर्न भरले नाही, असे आढळून आल्यास त्याला आयकर कायद्याच्या कलम १४३ (३) अन्वये नोटीस बजावण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना आहे. तसेच कोणत्याही करदात्याच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचा अधिकारही त्यांना आहे. तथापि, या प्रक्रियेअंतर्गत दरवर्षी केवळ १ टक्काच प्रकरणे होतात. आयकर विभागाकडून आलेल्या नोटिसीमुळे करदात्यांत दहशत निर्माण होते. विविध प्रकारचे दस्तावेज घेऊन आयकर कार्यालयात चकरा माराव्या लागतात. सीबीडीटीच्या चेअरपर्सन अनिता कपूर यांनी सांगितले की, आयकर अधिकाऱ्यांना जी अमर्याद शक्ती प्राप्त झालेली आहे, तिचा वापर करदात्यांना दहशतीत घेण्यासाठी करता येऊ नये, असा संकल्पच आमच्या विभागाने केला आहे.
करदात्यांना कर बोर्डाकडून अभय
By admin | Updated: June 24, 2015 23:55 IST