Join us

टाटांना हवा आहे जेट एअरवेजचा पूर्ण ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:46 IST

मुंबई : तोट्यात असलेल्या जेट एअरवेजचा ७४ टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव कंपनीचे मालक नरेश गोयल यांनी ठेवला आहे. यासाठी ...

मुंबई : तोट्यात असलेल्या जेट एअरवेजचा ७४ टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव कंपनीचे मालक नरेश गोयल यांनी ठेवला आहे. यासाठी टाटा कंपनी उत्सुक आहे. पण टाटांना जेटचा पूर्ण ताबा हवा आहे. त्यामुळे तूर्तास हा व्यवहार खोळंबल्याची चर्चा आहे.नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांची ५१ टक्के गुंतवणूक असलेल्या जेट एअरवेजला जून अखेरीस १३२३ कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीने वैमानिक व ‘अ’ दर्जातील अभियंत्यांना दोन महिन्यांपासून पगारही दिलेला नाही. त्यामुळे कंपनीची विक्री करण्यासंबंधी गोयल यांनी प्रस्ताव ठेवला होता. सूत्रांनुसार, जेटमध्ये सध्या गोयल यांच्याखेरीज २४ टक्के हिस्सा एतिहाद एअरलाइन्सचा आहे. त्याचीही गोयल यांना विक्री करायची आहे. पण २६ टक्के हिस्सा स्वत:कडेच ठेवण्यावर ते अडून आहेत. यानंतर जी नवीन संयुक्त कंपनी तयार होईल, त्याचे उपाध्यक्षपदही गोयल यांना हवे आहे. टाटा मात्र त्यास तयार नाहीत.टाटा सन्सची सध्या सिंगापूर एअरलाइन्ससह भागीदारीत ‘विस्तारा’ तर मलेशिया एअरलाइन्ससह एअर आशिया अशा दोन संयुक्त कंपन्या आहेत. टाटांनी आता त्यांच्या विमानसेवा क्षेत्राची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच त्यांना ‘जेट एअरवेज’चा पूर्ण ताबा हवा आहे. मात्र या घडामोडींना जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिलेला नाही. तर टाटाच्या प्रवक्त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. यासंबंधी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन व नरेश गोयल यांची बैठकही झाली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :टाटा