Join us  

मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर टाटा सन्सची वाढच झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 2:46 AM

कंपनीचा दावा; सर्वोच्च न्यायालयातही दिली माहिती

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करून चेअरमनपदी एन. चंद्रशेखरन यांची निवड केल्यापासून ‘टाटा सन्स’ वृद्धीच्या मार्गावर अग्रेसर झाली आहे. अनेक वित्तीय मापदंडांवर कंपनीने सुधारणा केल्याचे दिसून येत आहे, असे टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्ती करण्याच्या राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाच्या (एनसीएलएटी) निर्णयास टाटा समूहाने आव्हान दिले आहे. याचिकेत म्हटले आहे की, सायरस इन्व्हेस्टमेंट व स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट यांचा सहभाग असलेल्या शापूरजी पालनजी समूहाने टाटा सन्समध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अपील लवादाचा निष्कर्ष चुकीचा आहे. एसपी समूहाची टाटा सन्समधील गुंतवणूक ६९ कोटी रुपये आहे. सायरस इन्व्हेस्टमेंट व स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटने टाटा सन्समधील बहुतांश हिस्सेदारी बोनस व राइट इश्यूतून मिळविली आहे. सायरस व स्टर्लिंगने ६९ कोटी रुपये गुंतविलेले असताना, १९९१ ते २०१६ या काळात लाभांशापोटी त्यांना ८७२ कोटी रुपये टाटा सन्सकडून मिळाले.एसपी समूहाने १९६५ मध्ये ४० सामान्य समभाग व ४८ प्राधान्य समभाग खरेदी करून टाटा सन्समध्ये भागीदारी मिळविली. त्यांच्या ६९ कोटींच्या गुंतवणुकीचे (बहुतांश १९९५ मधील राइट इश्यूतून) मूल्य मार्च, २०१६ मध्ये ५८,४४१ कोटी झाले.मिस्त्री असताना टाटा समूहातील कंपन्यांची कामगिरी असमाधानकारक होती. ‘वेल्सपन रिन्युएबल्स एनर्जी’चे ९ हजार कोटी रुपयांत अधिग्रहण करण्याचा निर्णय घेताना मिस्त्री यांनी संचालक मंडळास अंधारात ठेवले. त्यामुळे टाटा सन्सचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्यांना पदावरून करण्याचा निर्णय घेतला.अपील लवादात निर्णय राखीवटाटा-मिस्त्री वादात कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने राखून ठेवला आहे. पुढील आठवड्यात सोमवारी त्यावर निर्णय येऊ शकतो.टाटा समूहाचे खासगी कंपनीत रूपांतर करण्याची कंपनी निबंधकांची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे अपील लवादाने मारले होते. त्यामुळे कंपनी निबंधकांनी ही याचिका दाखल केली आहे. आपण नियमानुसारच टाटा समूहाचे स्वरूप बदलले, असे निबंधकांनी म्हटले आहे.

टॅग्स :टाटा