Join us  

टाटा नॅनोचे उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर? जून महिन्यात बनवली केवळ एक कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 11:11 PM

 देशातील मध्यमवर्गीयांना हक्काच्या गाडीचे मालक बनण्याचे स्वप्न दाखवत रतन टाटा यांनी बाजारात आणलेली टाटा नॅनो अखेरच्या घटका मोजत आहे.

नवी दिल्ली -  देशातील मध्यमवर्गीयांना हक्काच्या गाडीचे मालक बनण्याचे स्वप्न दाखवत रतन टाटा यांनी बाजारात आणलेली टाटा नॅनो अखेरच्या घटका मोजत आहे. जून महिन्यामध्ये टाटा कंपनीने केवळ एकाच नॅनो कारचे उत्पादन केल्याने टाटाकडून नॅनो कारचे उत्पादन बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र टाटा नॅनोचे उत्पादन बंद करण्याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे टाटा कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात केवळ तीन टाटा नॅनो कारची विक्री झाली होती. तसेच टाटा मोटर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यावर्षी जून महिन्यात एकाही नॅनो कारची निर्यात झाली नव्हती. गेल्यावर्षी जून महिन्यात 25 नॅनो कारची निर्यात झाली होती. तसेच यावर्षी जून महिन्यामध्ये केवळ एकाच नॅनो कारची निर्मिती झाली आहे. तर गतवर्षी जून महिन्यामध्ये सुमारे 275 टाटा नॅनो कारची निर्मिती झाली होती. तसेच गेल्यावर्षी देशांतर्गत बाजारात 167 टाटा नॅनो कारची विक्री झाली होती. मात्र यावर्षी केवळ तीन कारची विक्री झाली आहे.  टाटा नॅनोची निर्मिती बंद करण्याविषयी विचारणा केली असता टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत 2019 नंतर नॅनोचे उत्पादन बाजारात आणणे शक्य होणार नाही. मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नॅनोचे उत्पादन सुरू राहील.  

टॅग्स :टाटाकारव्यवसाय