Join us  

गुड न्यूज! Tata ने BOI सोबत केली भागीदारी; ग्राहकांना मिळेल स्वस्त कर्जाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 3:46 PM

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या ग्राहकांना परवडणारे कर्ज देण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून TATA ची दमदार कामगिरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा ग्रुपच्या Tata Motors कंपनी शेअर मार्केट तसेच भारतीय बाजारात अनेक बड्या कंपन्यांना धोबीपछाड देताना दिसतेय. अशातच टाटा मोटर्स कंपनीने आपल्या ग्राहकांना परवडणारे कर्ज देण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे.

या कराराचा एक भाग म्हणून, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना ६.८५ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देईल. तसेच या भागीदारीअंतर्गत कंपनी आपल्या सर्व प्रवासी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक वित्तपुरवठा सुविधेचा पर्याय देईल, असे सांगितले जात आहे.  

ग्राहकांना मिळून शकेल ९० टक्क्यांपर्यंत कर्ज

टाटा मोटर्स आणि बँक ऑफ इंडियाने केलेल्या भागीदारीनंतर आता बँकेकडून वाहनाच्या एकूण किंमतीच्या जास्तीत जास्त ९० टक्के कर्ज ग्राहकांना मिळू शकेल. तसेच ग्राहकांना ७ वर्षांसाठी कर्जाची परतफेड करण्याची सुविधा मिळेल. ग्राहक १ हजार ५०२ रुपये प्रति लाख पासून कर्जाच्या हप्त्याचा पर्याय निवडू शकतात. ऑफर देशभरातील वैयक्तिक विभागातील खरेदीदारांसाठी ICE कार आणि SUV च्या नवीन फॉरेव्हर रेंज तसेच इलेक्ट्रिक वाहनांवर लागू असणार आहे. तसेच बँक ऑफ इंडिया ३१ मार्च २०२२ पर्यंत टाटा मोटर्स कार खरेदीदारांकडून शून्य प्रक्रिया शुल्क वसूल करेल, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अलीकडेच टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहन खरेदीदारांना मदत करण्यासाठी सर्वांत मोठ्या लघु वित्त बँकांपैकी एक Equitas SFB सोबतही ५ वर्षांचा करार केला आहे. टाटा मोटर्सकडून पहिले व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्यांना यामुळे फायदा होईल. इच्छुक खरेदीदारांसाठी वित्तपुरवठा सुलभ करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. टाटा मोटर्स या भागीदारीअंतर्गत देशातील ८६१ शाखांमध्ये पसरलेल्या Equitas SFB चे मजबूत नेटवर्क आणि ५५० हून अधिक कमर्शियल व्हेईकल ग्राहक टचपॉईंट वापरून ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. 

टॅग्स :टाटाबँक ऑफ इंडिया