मुंबई : थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यात ४0 ते ५0 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाचे विमा कंपन्यांनी जोरदार समर्थन केले आहे. या वाढीच्या विरोधात वाहतूकदारांनी देशव्यापी संपाची धमकी यापूर्वीच दिली आहे.न्यू इंडिया इन्शुरन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, कंपन्यांनी केलेली वाढ इरडाने सुचविलेल्या वाढीपेक्षा कमीच आहे. इरडाने थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यात १४ टक्क्यांपासून १0८ टक्क्यांपर्यंत वाढ सुचविली होती. चालू आर्थिक वर्षातील ९ ते २0 टक्के नियमित वाढीच्या व्यतिरिक्त ही वाढ आहे. श्रीनिवासन हे साधारण विमा कंपन्यांच्या संघटनेचे प्रमुख आहेत. त्यांनी म्हटले की, या क्षेत्रात जोखीम जास्त आहे. कंपन्यांनी आपले म्हणणे यापूर्वीच इरडासमोर मांडले आहे. आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) या वाढीला तीव्र विरोध केला असून देशव्यापी चक्काजामचा इशारा दिला आहे. एआयएमटीसीचे अध्यक्ष भीम वाधवा यांनी एका निवेदनात म्हटले की, इरडाने आमचे म्हणणे न ऐकल्यास देशव्यापी संपाशिवाय आमच्या समोर कोणताही पर्याय नाही. २६ मार्च रोजी झालेल्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे. संपामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे संप करण्याची आमची इच्छा नाही. तथापि, आम्हाला संप करणे भाग पाडले जात आहे. (प्रतिनिधी)
थर्ड पार्टी विमा हप्त्यातील वाढीचे कंपन्यांकडून समर्थन
By admin | Updated: March 29, 2015 23:14 IST