Join us

भारतीय उद्योग महासंघाचा राजन यांना पाठिंबा

By admin | Updated: June 3, 2016 02:39 IST

भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून रघुराम राजन यांच्यावर सतत टीका होत असली तरी राजन यांनी गव्हर्नर या नात्याने देशासाठी मोठे काम केले आहे

ओसाका (जपान) : भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून रघुराम राजन यांच्यावर सतत टीका होत असली तरी राजन यांनी गव्हर्नर या नात्याने देशासाठी मोठे काम केले आहे, अशा शब्दांत भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) त्यांना पाठिंबा दिला आहे.कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष नौशाद फोर्बस यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वैयक्तिक हल्ल्यांचे समर्थन करता येत नसल्याच्या व्यक्त केलेल्या मताला दुजोरा दिला. जेटली काय म्हणाले एवढेच मी पुन्हा सांगतो की वैयक्तिक हल्ले हे समर्थनीय नाहीत. अशा हल्ल्यांमुळे देशाचा म्हणून काही लाभ होतोय ,असे मला वाटत नाही. प्रत्यक्षात ते हल्ले खालच्या पातळीवरील सिद्ध होतात. या मुद्यावर मी जेटलींशी शंभर टक्के सहमत आहे, असे फोर्बस म्हणाले.जेटली यांच्यासोबत सहा दिवसांच्या जपान दौऱ्यावर फोर्बस आले आहेत. राजन यांनी देशासाठी मोठे काम केले आहे आणि त्यांची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती झाली, तर त्याकडे आम्ही सकारात्मक पाऊल म्हणून बघू, असे फोर्बस म्हणाले. राजन यांची गव्हर्नरपदी नियुक्ती ४ सप्टेंबर २०१३ रोजी तीन वर्षांसाठी तेव्हाच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने केली होती. राजन यांना व्याजदर खाली आणून आर्थिक विकासाला चालना देण्यात अपयश आल्याचा ठपका भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी व भाजपच्या काही गटांकडून ठेवला जात आहे.