मुंबई : बॅँकांतर्फे ग्राहकांना दिल्या जाणार्या विविध सेवांमधील त्रुटींबाबत, तसेच चुकीच्या विक्रीबाबत बॅँकांना जबाबदार ठरविणारा ग्राहक संरक्षण नियम लवकरच लागू केला जाणार असल्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बॅँकेतर्फे करण्यात आली आहे. बॅँकिंग कोडस् अँड स्टँडर्डस् बोर्ड आॅफ इंडियाच्या परिषदेत बोलताना रिझर्व्ह बॅँकेच्या कार्यकारी संचालक दीपाली पंत-जोशी यांनी वरील माहिती दिली. ही नियमावली तयार होण्यास सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही नियमावली लागू करणे बॅँकांना बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०१४-१५ चे वार्षिक पतधोरण मांडताना रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बॅँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात ग्राहक संरक्षणासाठी कायदेशीर नियमावली असण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता ही नियमावली तयार केली जात असल्याचे पंत-जोशी यांनी सांगितले. सध्या बॅँकिंग क्षेत्रात वेगवेगळे प्रॉडक्ट खरेदी करताना ग्राहकांना सावध राहावे लागते. यामध्ये बदल करून आता विक्रेते सावध (सेलर बिवेअर) प्रकारचे धोरण ठरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या प्रॉडक्टची विक्री अथवा त्यापासून होणार्या हानीसाठी यापुढे बॅँकांना जबाबदार धरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बॅँकिंग लवादाकडे (बॅँकिंग ओम्बुड्समन) आलेल्या तक्रारींचे विश्लेषण केले असता त्यामधील बहुसंख्य तक्रारी या बॅँकांच्या सेवेबाबत असतात. क्रेडिट आणि डेबिट कार्डबाबतच्या तक्रारी अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे देशातील बॅँकांना आपल्या ग्राहकसेवेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महाबीजकडून २४.५0 हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
By admin | Updated: May 22, 2014 02:14 IST