Join us

साखर उद्योग विकास परिषद संपुष्टात येणार

By admin | Updated: November 5, 2014 03:49 IST

केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाने ५६ वर्षे जुनी साखर उद्योग विकास परिषद अर्थात डीसीएसआय संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली : केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाने ५६ वर्षे जुनी साखर उद्योग विकास परिषद अर्थात डीसीएसआय संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कालबाह्य कायदे व समित्या संपुष्टात आणण्याच्या सरकारच्या धोरणांतर्गत हा निर्णय झाल्याचे समजते.साखर उद्योग नियंत्रणमुक्त व परवानामुक्त केल्यानंतर आता या घटनात्मक संस्थेची गरज नसल्याचा दावा सरकारने काल केला आहे. नवीन साखर कारखाने उभारण्यासाठी परवाना देणे व अन्य मुद्यांचे नियंत्रण ही परिषद करत असत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने डीसीएसआयची पुनर्रचना केली जाते.अन्नधान्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सद्य:स्थितीत साखर परिषदेची उपयोगीता राहिली नाही. विशेषत: साखर उद्योग नियंत्रणमुक्त व परवानामुक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद कायम ठेवणे औचित्यपूर्ण नाही. या पार्श्वभूमीवर परिषदेची पुनर्रचना न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता ही परिषद संपुष्टात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)