Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीसाठी देणार ४ हजारांचे अनुदान

By admin | Updated: January 9, 2015 23:47 IST

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या साखर कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर निर्यातीवरील अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

नवी दिल्ली : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या साखर कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर निर्यातीवरील अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. चालू विपणन वर्ष २०१४-१५ साठी साखर निर्यातीवरील अनुदान प्रतिटन ४,००० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.गेल्यावर्षी केंद्राने शेतकऱ्यांची ऊसदेणी चुकती करण्यासाठी साखर कारखानदारांना मदत जाहीर केली होती. साखर कारखानदारांना ४० लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदानाची घोषणा केली होती. ही अनुदान योजना सप्टेंबर २०१४ मध्ये समाप्त झाली होती.सरकारी सूत्रांनी सांगितले की, ‘विपणन वर्ष २०१४-१५ (आॅक्टोबर ते सप्टेंबर) साठी कच्च्या साखरेच्या निर्यातीवर सबसिडी देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. सध्याच्या बाजार किमतीचा विचार करता अनुदानाची रक्कम जवळपास ४,००० रुपये प्रतिटन एवढी निश्चित करण्यात आली आहे.’ एक मंत्रिमंडळीय परिपत्र यापूर्वीच तयार करण्यात आले असून अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या मंजुरीनंतर आंतरमंत्रालयीन सल्ल्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अन्य एका सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी केंद्र सरकारने दर दोन महिन्यांनी अनुदान रकमेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने सुरुवातीला फेब्रुवारी-मार्चसाठी ३,३०० रुपये प्रतिटन एवढे अनुदान निश्चित केले होते. एप्रिल-मेमध्ये कमी करून २,२७७ रुपये आणि जून-जुलैमध्ये पुन्हा ३,३०० रुपये प्रतिटन एवढी रक्कम निश्चित करण्यात आली होती. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये ही रक्कम पुन्हा वाढवून ३,३७१ रुपये प्रतिटन केली गेली.भारतीय साखर कारखाना संघ अर्थात इस्माच्या मते, देशांतर्गत बाजारात साखरेचा दर उत्पादन खर्चाहून कमी आहे. कारखान्यांसाठी शेतकऱ्यांना उसाचे देणेही जिकिरीचे झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) वर्ष २०१३-१४ मध्ये भारताने २.४४ कोटी टन साखरेचे उत्पादन घेतले. यापैकी २१.१ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती.४साखर कारखान्यांनी विपणन वर्ष २०१३-१४ (आॅक्टोबर-सप्टेंबर)मध्ये सुमारे ७.५ लाख टन साखर निर्यात केली. यात सुमारे २०० कोटी रुपयांची मदत देण्यात आली.४साखर उद्योग यंदाही निर्यात अनुदान योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी करीत आहे. कारण साखर कारखाने गेल्या काही वर्षांत अधिक उत्पादनामुळे देशांतर्गत बाजारातील दरांत घसरण झाली आहे. यामुळे ऊसदेणी चुकती करण्यात कारखानदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.४जगात ब्राझीलनंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा साखर उत्पादक देश आहे. देशात चालू हंगामात साखरेचे उत्पादन पहिल्या तीन महिन्यांतच २७.३ टक्क्यांनी वाढून ७४.६ लाख टन झाले आहे. इस्माने चालू हंगामासाठी २.५ ते २.५५ कोटी टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे सरकारने याच कालावधीत दोन कोटी ५०.५ लाख टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे.