Join us

शेअर बाजाराचा पुन्हा नवा विक्रम

By admin | Updated: November 22, 2014 02:56 IST

कोट महिंद्रा आणि वैश्य बँकेच्या विलीनीकरणाच्या घोषणेने शुक्रवारी शेअर बाजारात तेजीला उधाण आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढला

मुंबई : कोट महिंद्रा आणि वैश्य बँकेच्या विलीनीकरणाच्या घोषणेने शुक्रवारी शेअर बाजारात तेजीला उधाण आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने ७५.४५ अंकांची कमाई केली.गेल्या ३ आठवड्यांतील सेन्सेक्सची सर्वोत्तम तेजी आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सुधारणांना आणखी गती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात काल तेजीचे वातावरण दिसून आले. त्याचा परिणाम आज भारतीय बाजारांत दिसून आला. कोटक महिंद्राने आयएनजी वैश्य बँकेचे अधिग्रहण केल्याची घोषणा झाल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील समभागांची मागणी वाढली. परिणामी बाजार उसळला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वर चढले. सेन्सेक्सच्या वाढीत त्यांचे १५0 अंकांचे योगदान राहिले. कोटक महिंद्रा बँकेचा शेअर ३.७ टक्क्यांनी वाढला. आयएनजी वैश्य बँकेचा शेअर मात्र जवळपास स्थिर राहिला. ३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने सकाळी उघडतानाच तेजी दर्शविली. एका क्षणी तो २८,३६0.६६ अंकांच्या आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर गेला होता. दिवस अखेरीस २६७.७.0७ अंकांची अथवा 0.९५ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २८,३३४.६३ अंकांवर बंद झाला. ही वाढ सेन्सेक्सची सार्वकालिक सर्वोच्च पातळी आहे. याशिवाय आजची सेन्सेक्सची वाढ ३१ आॅक्टोबरनंतरची सर्वांत मोठी वाढ ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ५१९.५0 अंकांनी वर चढला होता. सेन्सेक्सने काल ३४.७१ अंक अथवा 0.१२ अंकांची वाढ नोंदविली होती. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २४ कंपन्यांनी तेजीचा लाभ घेतला. ६ कंपन्यांचे शेअर मात्र कोसळले. तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत भेल, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, सिप्ला, महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे. एचडीएफसी, टाटा मोटर्स, हीरो मोटोकार्प आणि सेसा स्टरलाईट यांचे शेअर्सही तेजीत राहिले. घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत इन्फोसिस, टाटा पॉवर, सन फार्मा, एचयूएल, टाटा स्टील यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)