Join us

शेअर बाजाराने पुन्हा घेतली उसळी

By admin | Updated: January 8, 2015 23:46 IST

तीन दिवसांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा एकदा उसळी घेतली.

मुंबई : तीन दिवसांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३६५.८९ अंकांनी उसळून २७,२७४.७१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२.५0 अंकांनी उसळून ८,२३४.६0 अंकांवर बंद झाला. रिअल्टी, बँकिंग, एफएमसीजी, ऊर्जा, वाहन, धातू, आरोग्यसुविधा आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांतील कंपन्यांना आजच्या तेजीचा लाभ झाला. ब्ल्यूचिप कंपन्यांच्या समभागांनी नवी भरारी घेतली. त्याचप्रमाणे स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांचे समभागही वाढले. बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीसह २७,१७८.७७ अंकांवर उघडला. नंतर तो सतत वर जात राहिला. २७,३१६.६१ अंकांच्या पातळीपर्यंत वर चढल्यानंतर तो थोडा कोसळून २७,१0१.९४ अंकांपर्यंत खाली आला. सत्रअखेरीस २७,२७४.७१ अंकांवर बंद झाला. ३६५.८९ अंक अथवा १.३६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सेक्स घसरत होता. या काळात ९७९.0८ अंकांची अथवा ३.५१ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली होती. आरआयएल वगळता सेन्सेक्समधील उरलेल्या सर्व २९ कंपन्यांचे समभाग वाढले. टाटा मोटर्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, इन्फोसिस, कोल इंडिया आणि गेल यांना सर्वाधिक लाभ मिळाला. २५० कंपन्यांचा समावेश असलेल्या एनएसई निफ्टी १३२.५0 अंक अथवा १.६४ टक्क्यांची वाढ नोंदवून ८,२३४.६0 अंकांवर बंद झाला. निफ्टीमधील ४८ कंपन्यांचे समभाग वाढले. ब्रोकरांनी सांगितले की, अमेरिकेतील डिसेंबरमधील रोजगारांची आकडेवारी उत्साहवर्धक राहिली आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. युरोपातील आकडेवारी कमजोर असल्याचे समोर आल्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेकडून आक्रमक प्रोत्साहन उपाय जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन गुरुवारी भारतीय शेअर बाजारांत तेजीचे वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराने जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार, काल विदेशी गुंतवणूकदारांनी १,0७३.१८ कोटी रुपयांचे समभाग विकले. ४आशियाई बाजारांपैकी हाँगकाँग, जपान, सिंगापूर, तैवान, दक्षिण आफ्रिका येथील शेअर बाजार 0.६५ टक्का ते १.७४ टक्का वाढले. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र २.३९ अंकांनी कोसळला. युरोपातील जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्स येथील बाजार १.२१ टक्का ते १.२६ टक्का वर चढले. ४बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. २,0५0 कंपन्यांचे समभाग वाढले. ८२३ कंपन्यांचे समभाग घसरले. १0१ कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले. बाजारातील उलाढाल ३,२३१.१६ कोटी इतकी झाली. काल ती ३,२१0.३५ कोटी होती.