मुंबई : स्थानिक शेअर बाजार मंगळवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी खाली आला. गुंतवणूकदारांनी रियल्टी, वीज, तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सची विक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३५ अंकांनी घसरून २८,७०९.८७ अंकांवर आला. महिनाभरापूर्वीपेक्षाही तो आता खाली आला आहे.अमेरिकेत व्याजदरांत वाढ होण्याची आशा असली तरी त्याआधी सेन्सेक्स वाढेल का अशी बाजारात शंका आहे. मुंबई शेअर बाजारचा ३० शेअर्सवाला सेन्सेक्स सकारात्मक कलाने खुला झाल्यानंतर लवकरच दडपणाखाली आला. सोमवारी सेन्सेक्स ६०४ अंकांनी खाली आला होता. कामकाज सुरू असताना २८,५८४.४९ अंकांच्या खाली तो आला होता. तथापि, शेवटच्या तासात सेन्सेक्सची घसरण काहीशी रोखली गेली. शेवटी १३५ अंकांच्या (०.४७ टक्के) नुकसानीने तो २८,७०९.८७ अंकांवर बंद झाला. ११ फेब्रुवारीनंतरचा हा सगळ्यात खालचा अंक आहे. व्यवहार सुरू असताना सेन्सेक्स २८,९४९.११ अंक एवढ्या उंचही गेला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीदेखील ४४.७० अंक (०.५१ टक्के) टक्के नुकसानीने ८,७१२.०५ अंकांवर आला. कामकाजादरम्यान तो दिवसभरातील सगळ्यात खालच्या पायरीवर म्हणजे ८,६७७.३५ अंकांपर्यंत खाली आला.