मुंबई : तीन दिवसांच्या कमजोर वातावरणानंतर शेअर बाजारांनी गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचा मार्ग धरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२0 अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी २७ अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर पोहोचला. एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांना उत्तम मागणी आल्यामुळे बाजाराला बळ मिळाले. आयटीसीने सेन्सेक्सच्या वाढीत सर्वाधिक योगदान दिले. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स ५.४४ टक्क्यांनी वर चढला. सुट्या सिगारेटी विकण्यावरील बंदी केंद्र सरकार मागे घेणार असल्याची आशा निर्माण झाल्यामुळे आयसीटीचे समभाग उसळले आहेत. आयसीटीच्या उसळीमुळे इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, भारती एअरटेल, एम अँड एम आणि हिंदाल्को या बड्या कंपन्यांच्या समभागांतील घसरणीचा परिणाम सेन्सेक्सवर झाला नाही. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल ३९१.0७ कोटी रुपयांची शेअर खरेदी केली, असे शेअर बाजाराच्या हंगामी आकडेवारीतून स्पष्ट झाले. सकाळी सेन्सेक्स तेजीसह २८,६१६.९३ अंकांवर उघडला. नंतर तो आणखी वर चढत २८,८0८.७८ अंकांवर पोहोचला. खरेदीदारांचा उत्साह नंतर थोडा कमी झाल्याने दिवसअखेरपर्यंत ही वाढ कमी झाली. अखेर सेन्सेक्स १२0.११ अंक अथवा 0.४२ टक्का वाढ नोंदवून २८,५६२.८२ अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात युरोपचे शेअर बाजार तेजीत होते. युरोपीय सेंट्रल बँकेच्या वित्तीय आढाव्यापूर्वी आश्वासक वातावरण निर्माण झाल्याने बाजार सकारात्मक वातावरणात होते. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन येथील बाजार 0.0९ टक्का ते 0.३७ टक्का यादरम्यान तेजीत होते. अमेरिकेच्या डाऊ जोन्सेने काल विक्रमी झेप घेतली होती. त्याचाही परिणाम दिसून आला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १३ कंपन्यांचे समभाग वर चढले. १७ कंपन्यांचे समभाग कोसळले. सीएनएक्स निफ्टी २६.७५ अंकांनी वाढून ८,५६४.९५ अंकांवर बंद झाला. १ डिसेंबरचा ८,६२३ अंकांचा विक्रम त्याने मोडला.
शेअर बाजार पुन्हा तेजीत
By admin | Updated: December 5, 2014 08:55 IST