ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती आणि जपानमध्ये संसदीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा विजय यामुळे जागतिक शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४५० पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली असून, बीएसई सेन्सेक्स २७५०० च्या पुढे आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ८४०० च्या पुढे आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये नऊ महिन्यातील ही सर्वात मोठी उसळी आहे. मागच्या महिन्यात अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये २ लाख ८७ हजार नव्या नोक-यांची निर्मिती झाली तसेच जपानमध्ये पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या सत्ताधारी पक्षाच्या संसदीय निवडणुकीतील विजयामुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
मागच्यावर्षी २६ ऑक्टोंबरला सेन्सेक्स २७,५९० अंकांवर पोहोचला होता. भांडवली वस्तू, बँकिंग, धातू आणि बांधकाम क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आहे.