Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार एक महिन्याच्या उच्चांकावर

By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST

बुधवारी शेअर बाजार पुन्हा वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९२ अंकांनी वाढून २७,८३७.२१ अंकांवर बंद झाला. या तेजीबरोबर सेन्सेक्स एक महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे.

मुंबई : बुधवारी शेअर बाजार पुन्हा वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९२ अंकांनी वाढून २७,८३७.२१ अंकांवर बंद झाला. या तेजीबरोबर सेन्सेक्स एक महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे. सेन्सेक्स सकाळपासूनच तेजीत होता. एका क्षणी तो २७,९0३.0१ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्र अखेरीस १९१.६८ अंकांची अथवा 0.६९ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २७,८३७.२१ अंकांवर बंद झाला. २२ एप्रिल रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७.६0 अंकांनी अथवा 0.६९ टक्क्यांनी वाढून ८,४२३.२५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो तेजी-मंदीचे हेलकावे खात असलेला दिसून आला. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर काल संमिश्र कल दिसून आला होता. त्याचा परिणाम म्हणून आशियाई बाजारातही हाच कल राहिला. चीन, जपान आणि दक्षिण कोरिया येथील बाजार वर उठले. या उलट हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार घसरले. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात नरमाईचा कल दिसून आला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला कर्जाची परतफेड करू शकणार नसल्याचे ग्रीसने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. त्याचा विपरीत परिणाम युरोपीय बाजारांवर दिसून आला.