Join us

शेअर बाजार आधी वाढला, अंतिम टप्प्यात घसरला !

By admin | Updated: February 26, 2015 00:23 IST

अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी भारतीय शेअर बाजारांनी आधी मोठी उसळी घेतली. तथापि, नंतर बाजार घसरून आदल्या दिवशीच्या पातळीच्या जवळपासच बंद झाले.

मुंबई : अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी भारतीय शेअर बाजारांनी आधी मोठी उसळी घेतली. तथापि, नंतर बाजार घसरून आदल्या दिवशीच्या पातळीच्या जवळपासच बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने अवघी ३.३३ अंकांची, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ५.१५ अंकांची वाढ नोंदविली.केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी संसदेत मांडला जाणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी रेल्वेचा अर्थसंकल्प, तर शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडले जाणार आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असल्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २९,११५.३२ अंकांवर तेजीसह उघडला होता. नंतर तो २९,२६९.८३ अंकांपर्यंत वर चढला होता. बाजारात अशा प्रकारे तेजीचा माहोल असताना शेवटच्या ९0 मिनिटांत विक्रीचा तुफान मारा झाला. त्यामुळे आधी मिळविलेली वाढ सेन्सेक्सने गमावली. एका क्षणी तो २८,९६७.६१ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्रअखेरीस ३.३३ अंक अथवा 0.0१ टक्का वाढीसह तो २९,00७.९९ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५.१५ अंक अथवा 0.0६ टक्का वाढीसह ८,७६७.२५ अंकांवर बंद झाला. त्याआधी तो ८,८४0.६५ अंकांपर्यंत वाढला होता. तथापि, नंतर ही सर्व वाढ त्याला गमवावी लागली. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एल अँड टी, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचा समावेश आहे. आयटीसी, एचडीएफसी, विप्रो आणि भारती एअरटेल यांचे समभाग वाढले. ग्रीसच्या बचाव पॅकेजला युरोझोनच्या अर्थमंत्र्यांनी ४ महिन्यांची मुदतवाढ दिल्याने युरोपीय बाजार घसरणीला लागल्याचे दिसून आले. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0८ टक्का ते 0.१९ टक्का घसरले. आशियाई बाजारात मात्र तेजीचे वातावरण होते. सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया येथील बाजार 0.११ टक्का ते 0.७३ टक्का वर चढले. चीन आणि जपान येथील बाजार 0.१0 टक्का ते 0.५६ टक्का घसरले.