- पुष्कर कुलकर्णी(शेअर बाजार अभ्यासक)आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार हे मला माहित होते. काल पर्यंत माझ्यावर अदानी समूहाचा नकारात्मक परिणाम होताच. खरे तर माझ्या हातात मी नसतोच.. गुंतवणूकदार मला जसे हवे तसे हलवीत असतात. कधी वर नेतात तर कधी खाली आपटवीत असतात. आज सकाळी मी सुरु होताना नेमके काय होणार याची मलाही कल्पना नव्हती. परंतु जस जसे अर्थसंकल्पाचे वाचन होत गेले तसतसा मी वरच्या दिशेला जात होतो. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्प सकारात्मक घेतला होता. त्याचे पडसाद उत्तम उमटत होते खरे. परंतु जसा मी वर गेलो ते पुन्हा खाली येण्यासाठीच. अदानी समूहाचा नकारात्मक परिणाम आजही थांबला नाही. नफा वसुली करत आणि वाढीव भावातील शेअर्सची जोरदार विक्री करत मला पुन्हा खाली आणले गेले. नेमक्या तरतुदी जाणत गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील शेअर्ससह इतरही काही कंपन्यांच्या शेअर्सला खाली आणले. आज मी खऱ्या अर्थाने चांगले आणि वाईट दोनही अनुभवले. आता उद्या सकाळी नक्की काय होणार हे मात्र मला माहित नाही. कारण मी आहे गुंतवणूकदारांच्या मनाचा गुलाम.. सापशिडीच्या खेळात कधी वर तर कधी खाली येणारा...
Stock Market: मी शेअर बाजार बोलतोय...
By पुष्कर कुलकर्णी | Updated: February 2, 2023 12:09 IST