Join us

शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक

By admin | Updated: November 18, 2014 00:03 IST

शेअर बाजारात जुने विक्रम मोडीत निघणे आणि नवे उच्चांक प्रस्थापित होण्याचा सिलसिला आजही कायम राहिला. प्रमुख कंपन्यांच्या समभागांना जोरदार मागणी

मुंबई : शेअर बाजारात जुने विक्रम मोडीत निघणे आणि नवे उच्चांक प्रस्थापित होण्याचा सिलसिला आजही कायम राहिला. प्रमुख कंपन्यांच्या समभागांना जोरदार मागणी झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३१.२२ अंकांनी उंचावून २८,१७७.८८ अंकाच्या नव्या विक्रमावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४०.८५ अंकांच्या तेजीसह ८,४३०.७५ अंकाच्या नव्या विक्रमी पातळीवर विसावला.जापानी अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली असल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर अन्य आशियाई बाजारात नरमीचा कल राहिला. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला आणि उच्चांकी पातळीवर नफाखोरी झाल्याने त्याने दिवसभराची नीचांकी पातळी २७,९२१.३४ अंकापर्यंत गेला. तथापि, नंतर मागणीच्या पाठबळाने सेन्सेक्स २८,२०५.७१ अंक या दिवसभराच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सने यापुर्वी १२ नोव्हेंबर रोजी २८,१२६.४८ अंक ही विक्रमी पातळी गाठली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दिवसाच्या सुरुवातीला ८,३४०.१० अंक या खालच्या पातळीवर उघडल्यानंतर खरेदीच्या माऱ्याने ८,४०० अंकाची पातळी ओलांडत ८,४३८.१० अंक या विक्रमी पातळीवर गेला. अखेरीस निफ्टी ४०.८५ अंक वा ०.४९ टक्क्यांच्या तेजीसह नवी विक्रमी पातळी ८,४३०.७५ अंकावर बंद झाला. शेअर ब्रोकर्संनी सांगितले की, बँकींग, ऊर्जा व यांत्रिकी क्षेत्राच्या समभागांच्या मागणीमुळे बाजार धारणा मजबूत झाली. दुसरीकडे आॅक्टोबरमध्ये व्यापार तूट कमी होऊन १३.३५ अब्ज डॉलर झाली. सप्टेंबरमध्ये १४.२ अब्ज डॉलर एवढी व्यापार तूट होती. जपानची जीडीपी आकडेवारी सोमवारी प्रसिद्ध झाली. या पार्श्वभूमीवर अन्य आशियाई बाजारात नरमाईचा कल राहिला. सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया यांचे शेअर निर्देशांक ०.०८ टक्के ते २.९६ टक्के यादरम्यान राहिले. (प्रतिनिधी)