Join us  

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 6:12 AM

सेन्सेक्स १४0 अंकांनी, तर निफ्टी २८ अंकांनी वाढला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला बुधवारी शेअर बाजारात उत्साह बघायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४0 पेक्षा अधिक अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ पेक्षा अधिक अंकांनी वाढला.

सेन्सेक्सने सुमारे ३00 अंकांची उसळी घेतली होती. तथापि, नंतर त्यात थोडी घट झाली. सत्राच्या अखेरीला सेन्सेक्स १४0.४१ अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी वाढून ३९,११0.२१ अंकांवर बंद झाला. निफ्टी २८.८0 अंकांनी अथवा 0.२५ टक्क्यांनी वाढून ११,७३७.९0 अंकांवर बंद झाला.इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक ४.४८ टक्क्यांनी वाढले. त्याखालोखाल सन फार्मा, बजाज आॅटो, भारती एअरटेल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, एचडीएफसी, वेदांता, एलअँडटी, कोटक बँक, मारुती आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग २.९२ टक्क्यांपर्यंत वर चढले. येस बँक, आयटीसी, पॉवरग्रीड, टीसीएस आणि एचयूएल यांचे समभाग २.३४ टक्क्यांपर्यंत घसरले.

जाणकारांनी सांगितले की, बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येत असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे बाजार सकारात्मक झाले आहेत. बीएनपी परिबास या संस्थेचे मुख्य सल्लागार हेमांग जैन यांनी सांगितले की, मोदी सरकार पुन्हा येत आहे, हे पाहून बाजार तेजीत आले आहेत. तथापि, प्रत्यक्ष निकालात भाजपला बहुमत मिळाले नाही, तर बाजारातील धारणा तात्काळ बदलेल. त्रिशंकू लोकसभा बाजारासाठी धोकादायक ठरेल. निवडणूक निकालानंतर बाजार धारणेऐवजी मिळकतीतील वृद्धी आणि भांडवली वृद्धी यासारख्या मूलभूत आधारांकडे परत येईल.विदेशी निधीचा ओघबाजारातील व्यावसायिकांनी सांगितले की, विदेशी निधीच्या सातत्यपूर्ण ओघामुळे बाजाराचा मूड उत्साही दिसून येत आहे. शेअर बाजारात उपलब्ध झालेल्या हंगामी आकडेवारीनुसार, मंगळवारी विदेशी संस्थांनी १,१८५.४४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. देशांतर्गत संस्थांनी मात्र १,0९0.३२ कोटी रुपयांचे समभाग विकले.

टॅग्स :शेअर बाजार