Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात परतली तेजी

By admin | Updated: August 5, 2015 22:58 IST

सेवा क्षेत्रातील वाढत्या घडामोडी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचे पाठबळ मिळाल्याने भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी परतली

मुंबई : सेवा क्षेत्रातील वाढत्या घडामोडी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचे पाठबळ मिळाल्याने भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी परतली. आयटी, आरोग्य, वाहन या क्षेत्रातील शेअर्सची गुंतवणूकदारांनी लक्षणीय खरेदी केल्याने बुधवारी शेअर बाजारात उत्साह संचारला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) दिवसअखेर १५१.१५ अंकांनी झेपावत २८,२२३.०८ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५१.०५ अंकांनी वधारत ८,५६७.९५ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने गाठलेला हा दोन आठवड्यातील उच्चांक आहे.विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्य राखत गुंतवणूक केल्याने बाजाराचा नूर पालटला. दोन महिन्यानंतर जुलै महिन्यात सेवा क्षेत्र वृद्धीच्या वाटेवर आल्याने शेअर बाजारातील उत्साह दुणावला.आयटी क्षेत्रातील शेअर्स खरेदीवर गुंतवणूकदारांनी जोर दिल्याने उत्साहात आणखी भर पडली. अमेरिकी फेडरल व्याजदर वाढवील, अशा अपेक्षा उंचावल्याने आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले. विप्रोचे शेअर्स २.९४ टक्क्यांनी, तर इन्फोसिसचे शेअर्स २.५२ टक्क्यांनी वाढले. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत एकूण नफा वाढल्याने भारती एअरटेलचे शेअर्सही ०.७७ टक्के वाढले. नेस्ले पुन्हा पटावर आली. या कंपनीचे शेअर्सही ७.५३ टक्क्यांनी वाढले.आशियातील तैवान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि जपानच्या शेअर बाजारातही तेजीचे वातावरण होते.