Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयोगाला हवेत कारवाईचे अधिकार

By admin | Updated: July 5, 2014 00:15 IST


- मावळत्या आयुक्त नीला सत्यनारायण यांची मागणी

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाला न्यायिक अधिकार नसल्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांविरूद्ध संबंधितांविरूद्ध आयोग कारवाई करू शकत नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळप्रमाणे राज्य निवडणूक आयोगालाही न्यायिक अधिकार मिळाले पाहिजेत, अशी मागणी राज्याच्या मावळत्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत केली.
सत्यनारायण यांचा कार्यकाळ संपत असून त्या शनिवारी आयुक्त पदावरून निवृत्त होत आहेत. यानिमित्त पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून आपण न्यायिक अधिकारांची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोटाला लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे आवाहन केले आणि नंतर माफी मागितली. आयोगाकडे कारवाईचे अधिकारच नसल्याने आम्हालाही तो विषय सोडून द्यावा लागला, असे त्या म्हणाल्या.
राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत नाही. आम्हाला स्वतंत्र मतदारयाद्या बनविण्याचे अधिकार नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोग जी यादी तयार करते तीच आम्हाला वापरावी लागते. त्यामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागतेे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका घेण्याचे काम आमचे आहे. या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात. त्या वेगवेगळ्या घेतल्याने आचारसंहितेमुळे विकास कामांना बाधा पोहोचते. ही बाबही आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे. भावी काळात आपण राजकारणात जाणार नाही. लेखनाचे काम सुरू आहे. तेच काम पुढे करणार आहोत, असेही नीला सत्यनारायण यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
-----------------------------------
.