Join us  

सायकलच्या छोट्या व्यवसायापासून सुरूवात, आज आहेत देशातील दुसऱ्या मोठ्या टेलिकॅाम कंपनीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 4:46 PM

दूरसंचार क्षेत्रात आज अनेक आव्हानं असली तरी भारती एअरटेल या क्षेत्रात भक्कमपणे उभी आहे.

व्यवसाय म्हटला तर प्रत्येकालाच कधी ना कधी अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा अडचणी येतात तेव्हा काही लोक डगमगून जातात. परंतु काही लोक असेही आहेत, ज्यांच्या समोर असंख्य अडचणी आल्या तरी त्यांनी हार न मानता त्याचा सामना केला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अडचणींचा धैर्यानं सामना केला. आज त्या व्यक्तीचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत भारती एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्याबद्दल.

भारती एअरटेलने या स्पर्धेत सातत्य राखलं आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओनं २०१६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री केली. या काळात अनेक कंपन्या बंदही पडल्या. तर काही यातून अद्यापही सावरलेल्या नाहीत. मात्र एअरटेल या शर्यतीत कायम आहे. आजही ती आपल्या ग्राहकांमध्ये भक्कमपणे उभी आहे.

कोण आहेत सुनील मित्तलसुनील भारती मित्तल यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५७ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. पंजाबचे प्रसिद्ध राजकारणी आणि दोन वेळा खासदार राहिलेले सतपाल मित्तल यांचे ते सुपुत्र. त्यांना आरामदायी जीवन नाही, तर मेहनत करून यश मिळवायचं होतं. सुनील मित्तल यांनी सुरुवातीचं शिक्षण मसुरीच्या बिनबर्ग स्कूलमधून केलं. सुनील मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, मोठमोठ्या शाळा-कॉलेजांमध्ये शिकूनही त्यांना यशाचा खरा धडा बाहेरच्या जगातूनच मिळाला. यामुळेच वडिलांप्रमाणे राजकारणाकडे वळण्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अशी झाली सुरुवातसुनील मित्तल यांनी आपल्या वडिलांकडून २० हजार रुपये घेतले आणि मित्रांसोबत सायकलचा व्यवसाय सुरू केला. सुनील मित्तल जेव्हा सायकलच्या व्यवसायात होते तेव्हा ते हिरो सायकलचे मालक आणि संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. सुनील मित्तल हे मोठ्या कुटुंबातील असले तरी त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या व्यवसायात त्यांना नफाही झाला, पण त्यांना भविष्यात यात संधी दिसत नव्हती.

अशी झाली एअरटेलची सुरुवातभारतात मोबाइल फोन टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली होती. १९९२ मध्ये सरकार मोबाईल नेटवर्क परवान्यांचा लिलाव करत होते. त्यावेळी सुनील भारती मित्तल यांची कंपनी भारती सेल्युलर लिमिटेड या लिलावात सहभागी झाली. त्याचा परवानाही त्यांना मिळाला. सुनील मित्तल यांनी या कंपनीअंतर्गत एअरटेल ब्रँड सुरू केला. यानंतर, १९९५ मध्ये, सुनील मित्तल यांनी सेल्युलर सेवा देण्यासाठी भारती सेल्युलर लिमिटेड सुरू केली. एअरटेलचे नाव आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. आज सुनील मित्तल यांची एकूण संपत्ती १४.८ बिलियन डॉलर आहे.परदेशातही एअरटेलभारती एअरटेल ही सध्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. सध्या त्यांचा व्यवसाय आशिया आणि आफ्रिकेतील १८ देशांमध्ये सुरू आहे. त्यांची ग्राहकसंख्या ३९९ मिलियनपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जातं. २०२३ मध्ये, फोर्ब्स मासिकानं त्यांना भारतातील १९ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती १४.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. २००७ मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

टॅग्स :एअरटेलव्यवसायसुनिल मित्तल