संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांमध्ये २०१५ नंतरच्या महत्त्वाकांक्षी अशा शाश्वत विकास कार्यक्रमावर (एसडीजी) एकमत झाले असताना भारताने या कार्यक्रमांपैकी काहींची आम्ही आधीच अंमलबजावणी सुरू केली असल्याचे म्हटले. सरकारने घेतलेले अनेक पुढाकार हे एसडीजीच्या या ना त्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत, असे १९३ देशांच्या संयुक्त राष्ट्रांतील भारताचे वकील अमित नारंग यांनी सांगितले.येत्या २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान येथे भरणाऱ्या शाश्वत विकास शिखर परिषदेत एसडीजी स्वीकारला जाणार आहे. या नव्या कार्यक्रमामुळे आम्हाला २०३० मध्ये नव्या जगाचे स्वप्न बघायला मिळेल. जग दारिद्र्यातून मुक्त व्हावे ही आम्हा सगळ्यांची इच्छा या कार्यक्रमाची प्रेरणा आहे व या जगाचा शाश्वत विकास शक्य आहे, असे नारंग म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासाची जी कामे हाती घेतली आहेत त्यातील अनेकांना एसडीजीने पावतीच दिली आहे. त्या अर्थाने विचार केला तर एसडीजीची अंमलबजावणी भारताने आधीच सुरू केली आहे, असे म्हणता येईल, असे अमित नारंग म्हणाले.भारताने महत्त्वाकांक्षी समजले जाणारे ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट सिटीज्’ व ‘स्कील इंडिया’ हे कार्यक्रम आर्थिक विकासाला आणि देशातील लक्षावधी नागरिकांचे दारिद्र्य दूर करणे आणि उत्पादनाला बळ देण्यासाठी राबविण्यास सुरुवात केली आहे.
युनोचा एसडीजी कार्यक्रम सुरू
By admin | Updated: August 5, 2015 22:41 IST