Join us  

‘स्टॅनफोर्ड’चे अर्थशास्रज्ञ पॉल आर. मिलग्रॉम आणि रॉबर्ट बी. विल्सन नोबेल पुरस्काराचे मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:06 AM

Nobel Awards News:कोविड-१९ महामारीमुळे जगभरात भीषण मंदी असून, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर आर्थिक वातावरणात मिलग्रॉम आणि विल्सन यांना हा पुरस्कार मिळत आहे.

स्टॉकहोम : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन अर्थशास्रज्ञांना सोमवारी नोबेल पारितोषिक जाहीर झाले. लिलावा-बाबत मांडलेला सिद्धांत आणि शोधलेली नवी लिलाव पद्धती, यासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे.

पॉल आर. मिलग्रॉम आणि रॉबर्ट बी. विल्सन अशी या अर्थतज्ज्ञांची नावे आहेत. ‘मिलग्रॉम आणि विल्सन यांच्या संशोधनामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदाते यांना लाभ झाला आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्थांनी त्यांची लिलाव पद्धती स्वीकारली आहे,’ असे नोबेल समितीने म्हटले आहे. ‘रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी स्टॉकहोम येथे त्यांच्या नावांची घोषणा केली.

कोविड-१९ महामारीमुळे जगभरात भीषण मंदी असून, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर आर्थिक वातावरणात मिलग्रॉम आणि विल्सन यांना हा पुरस्कार मिळत आहे. विल्सन (८३) आणि मिलग्रॉम (७२) हे गुरुशिष्य आहेत. विल्सन हे मिलग्रॉम यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत. मिलग्रॉम यांनी सांगितले की, विद्यार्थी, मित्र आणि सहकारी फार दिवसांपासून म्हणत होते की, मी आणि विल्सन यांना पुरस्कार मिळू शकतो. ही खरोखरच गोड बातमी आहे. विल्सन यांनी म्हटले की, या कामामागे माझे माजी विद्यार्थी असलेले मिलग्रॉम यांची भूमिका आहे. 

टॅग्स :नोबेल पुरस्कार