Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर बुडवेगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक

By admin | Updated: January 29, 2015 23:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर संकलन वाढविण्याच्या दृष्टीने आता वित्तमंत्रालयाने कर विभागातील

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर संकलन वाढविण्याच्या दृष्टीने आता वित्तमंत्रालयाने कर विभागातील उच्चाधिका-याचे एक विशेष ‘शक्तिशाली’ पथक तयार केले असून, याकरिता विशेष २०० अधिकाऱ्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, सेवाकर आणि प्राप्तिकर अशा दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असून, संशय येईल अशा व्यक्ती आणि कंपनी अशा कुणाच्याही चौकशीचे सखोल अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, कर संकलनात घट होण्याच्या पार्श्वभूमीवर केवळ वसुलीवर जोर न देता कर बुडवेगिरी करणाऱ्या लोकांचा आणि कंपन्यांचा शोेध घेण्याचे काम या पथकातर्फे होईल. आयुक्त दर्जाच्या ४० अधिकाऱ्यांची याकरिता नेमणूक करण्यात आली असून, या अधिकाऱ्यांना ‘लेखा परीक्षण आयुक्त’ असे विशेष पदनाम देण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथमच प्राप्तिकर, सेवा कर, अबकारी कर या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करप्रणालीतील अधिकाऱ्यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. यामुळे तिन्ही विभागांतील अधिकाऱ्यांना संयुक्त कारवाई करताना अन्य प्रकरणात मिळालेली माहितीही शेअर करता येणार आहे. अशा पद्धतीचा संयुक्त टीम स्थापन करण्याचा प्रयोग सर्व प्रथम चेन्नई येथे करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात कर संकलन घटल्यानंतर चेन्नई विभागाने अशी टीम तयार केली.गेल्या संपूर्ण वर्षात चेन्नई शहरात केवळ १७९ कोटी रुपयांचे कर संकलन झाले. मात्र, आता ही टीम सक्रिय झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर संकलनाने ११० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तेथे यंदा कर संकलनाची आकडेवारी २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता तेथील विभागाने व्यक्त केली आहे. तेथील प्रयोगाला मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर आता तेच मॉडेल राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)