नवी दिल्ली : मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. येत्या १ मेपासून नॅशनल रोमिंग आणि एसएमएसचा दर कमी करण्याचा निर्णय टेलिफोन रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (ट्राय) घेतला आहे. या निर्णयानुसार आऊटगोइंग कॉल आता एक मिनिटासाठी एक रुपयाऐवजी ८० पैसे असेल. एसटीडी कॉलचा मिनिटाचा दर १ रुपया ५० पैशांऐवजी १ रुपये १५ पैसे आकारला जाईल. रोमिंगद्वारे इनकमिंग कॉलचा खर्च मिनिटाला आताच्या ७५ पैशांऐवजी ४५ पैसे असेल आणि लोकल एसएमएस एक रुपयाऐवजी २५ पैसे आणि एसटीडी एसएमएससाठी दीड रुपयाऐवजी आता ३८ पैसे खर्च करावे लागतील, असे ट्रायने म्हटले. टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी खास रोमिंग योजना सादर कराव्यात, असे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर रोमिंगचे दर २०१३ मध्ये बदलले गेले होते व दर एक वर्षाने त्या दरांचा आढावा घेतला जावा, असेही ठरविण्यात आले होते. दूरसंचार दराचा मसुदा (६० वी दुरुस्ती) आदेश, २०१५ या वर्षी २ फेब्रुवारी रोजी संबंधितांसाठी दिला गेला होता. संबंधित पक्षांनी केलेल्या टीकाटिपणीनंतर ट्रायने फोन, एसएमएस, व्हॉईस कॉल्सचे दर निश्चित केले.
मोबाईलवरील बोलणे १ मेपासून होणार स्वस्त
By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST