Join us

सोयाबीनचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 28, 2015 01:51 IST

यावर्षी पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने विदर्भातील पेरणीला विलंब झाला असून, पाऊस येईल, या आशेवर जुलै, आॅगस्ट महिन्यात पेरलेल्या सोयाबीनला

अकोला : यावर्षी पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने विदर्भातील पेरणीला विलंब झाला असून, पाऊस येईल, या आशेवर जुलै, आॅगस्ट महिन्यात पेरलेल्या सोयाबीनला शेंगा कमी लागल्या आहेत. त्या शेंगाही अपरिपक्व असल्याने या शेंगा परिपक्व होण्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान, पावसानंतर एकदम तापमान वाढल्याने उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनचे उत्पादन घटण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी विदर्भात जवळपास १९ लाख हेक्टरच्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. यातील २० टक्केच्यावर पेरणी ही जून महिन्याच्या पावसात झाली आहे. हे सोयाबीन आता परिपक्व झाले असून, शेंगा वाळण्याच्या स्थितीत आहेत; परंतु जुलै, आॅगस्टमध्ये पेरणी केलेल्या शेंगामध्ये दाणे भरले नसून, या शेंगांना बाधा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसामुळे या सोयाबीनला अल्पसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात घट होईल. या सोयाबीनची वाढ झाली नाही; परंतु शेंगा आल्या असून, त्या अपरिपक्व असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु जूनच्या प्रथम पावसानंतर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली ते सोयाबीन परिपक्व झाले आहे. आता पाऊस आल्यास त्या सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता असल्याने सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)