Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेरा कंपन्यांना स्मार्टफोनचा फटका

By admin | Updated: May 4, 2016 02:27 IST

नियमित फोनसेवेपासून मेसेजिंगपर्यंत आणि सोशल नेटवर्किंगपासून ते कोणताही क्षण, क्षणात कॅमेराबंद करण्याची सुविधा स्मार्टफोनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचा फटका कॅमेऱ्याची

मुंबई : नियमित फोनसेवेपासून मेसेजिंगपर्यंत आणि सोशल नेटवर्किंगपासून ते कोणताही क्षण, क्षणात कॅमेराबंद करण्याची सुविधा स्मार्टफोनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचा फटका कॅमेऱ्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बसू लागला आहे. वार्षिक पातळीवर कॅमेऱ्याच्या विक्रीमध्ये ३५ टक्क्यांची घट दिसून आली आहे, तर त्या तुलनेत स्मार्टफोनच्या विक्रीत मात्र तब्बल १२० टक्के वाढ झाली आहे. उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून, या अहवालाच्या माध्यमातून रंजक माहिती पुढे आली आहे. स्मार्टफोनमधील सक्षम आणि अत्युच्च दर्जाच्या कॅमेऱ्याच्या सुविधेचा फटका हा प्रामुख्याने कॅमेरा कंपन्यांना बसला आहे. या मागची कारणमीमांसा करताना तज्ज्ञ नारायण चारी म्हणाले की, ‘स्मार्टफोनच्या किमती चार हजार रुपयांपर्यंतच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्याचा परिणाम म्हणजे, गेल्या चार वर्षांत स्मार्टफोनची विक्री चौपट वाढली आहे.’ आज कोणत्याही स्मार्टफोनमध्ये किमान ५ मेगापिक्सलचा तरी कॅमेरा असतोच. अगदी व्यावसायिक वापराचे नसले तरी उत्तम दर्जाचे डिजिटल फोटो यामधून कॅमेराबंद होतात. त्यामुळे स्वाभाविक ज्यांना फोटोग्राफीचा छंद आहे, ते लोक वगळता सामान्य लोक आता कॅमेरा खरेदी करण्याऐवजी स्मार्टफोनच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. स्मार्टफोन बाजारात अगदी नवे नवे येऊ लागले होते, त्या वेळीही काही मोबाइल कंपन्यांनी आपल्या काही निवडक हँडसेटमध्ये कॅमेऱ्याची सुविधा दिली होती. मात्र, त्या मोबाइल हँडसेटची तांत्रिक मर्यादा आणि परिणामी कॅमेऱ्याची मर्यादा (जेमतेम १ एम.पी.) यामुळे त्याचा फटका फारसा कॅमेऱ्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बसला नाही. मात्र, अँड्रॉईड, आयओएस, विन्डोज यांच्यासारख्या प्रणाली विकसित झाल्यानंतर अनेक कंपन्यांच्या हँडसेटनिर्मितीचा दर्जा उंचावला. त्या काळी केवळ स्वप्नवत वाटावे, असे फोन्स या कंपन्यांनी बाजारात सादर केले. यामध्ये अतिरिक्त मेमरी कार्ड आणि किमान ४ ते कमाल १४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि त्यातही त्याला आॅप्टिकल झूम असा अद्ययावत तंत्रज्ञानाचा साज चढला. याला जोड मिळाली, ती झपाट्याने लोकप्रिय झालेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाइटची. (प्रतिनिधी)शेवटच्या आठवड्यात अधिक पडझड2010 साली कॅमेरा कंपन्यांची देशातील एकत्रित उलाढाल ही अंदाजे ५५ ते ६० हजार कोटी रुपयांच्या घरात होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत या उलाढाली निम्म्याने घट होत, २०१५ मध्ये या कंपन्यांची एकत्रित उलाढाल ३२ हजार कोटी रुपयांच्या आसपास होती. या कंपन्यांनीही स्मार्टफोनशी सुसंगत अशी आपली व्हर्जन्स सादर केल्यामुळे जुन्या फोनमध्ये केवळ शोभेपुरत्या असलेल्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याचा वापर झपाट्याने वाढला आहे, तसेच ग्राहकांच्यातही जागरूकता वाढल्यामुळे लोक आता फोन घेताना त्यातील कॅमेऱ्याच्या क्षमतेची आवर्जून चौकशी करतात. अ‍ॅप्सचाही झाला फायदास्मार्टफोन लोकप्रिय होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, अनेक कंपन्यांनी त्यांची उत्पादने अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध केली. विशेष म्हणजे, फोटो एडिटिंग, स्पेशल इफेक्ट, फोटो अल्बम, कोलाज अशा सुविधा देणारीही काही अ‍ॅप्स काही कंपन्यांनी विकसित केली. ही अ‍ॅप्स ग्राहकांत चांगलीच लोकप्रिय आहे, तसेच मुळात आता फोटो प्रिंट करून घेण्याचा कल कमी होत फोटोचे डिजिटल जतन करण्याचा कल वाढल्याचाही फटका कॅमेरा उद्योगाला बसला.