नवी दिल्ली : स्वीडन सरकारने महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक या राज्यांत स्मार्ट शहरांची उभारणी करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपीच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांच्या मदतीने स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी स्वीडन प्रयत्नशील आहे. भारतात स्वीडनचे व्यापार आयुक्त अन्ना लिबर्ग यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील शहरी विकास आराखड्यावरील एका प्रलंबित सहमती पत्रावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. यामुळे भागीदारीतून काम करण्यास चालना मिळेल, अशी आशा आहे. एखादे शहर दत्तक घेण्यापेक्षा आम्ही वास्तवात पीपीपी मॉडेलवर काम करण्यास इच्छुक आहोत. यामुळे स्वीडनचे तज्ज्ञ व वैश्विक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात येईल, असा विश्वास लिबर्ग यांनी व्यक्त केला. नागरी नियोजन, वीज, शाश्वत वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात जागरूक स्वीडन कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत व्यापारी वाढीसाठी शक्यता पडताळून पाहत आहे. लिबर्ग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना पुुढे सांगितले की, भारतात स्वीडनच्या १५० कंपन्या असून यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये शहरी विकास क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे. आमची या क्षेत्रातील स्थिती पुर्वीपासूनच बळकट आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्रात स्वीडन उभारणार स्मार्ट सिटी
By admin | Updated: May 18, 2015 03:04 IST