इराकमधील तणाव आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, महागाईच्या दरामध्ये झालेली वाढ आणि गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा यामुळे शेअर बाजारात सलग दुसऱ्या सप्ताहात घसरण झालेली दिसून आली. असे असले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे.गतसप्ताहाच्या प्रारंभी बाजार काहीसा तेजीचे संकेत देत होता, मात्र त्यानंतर अनेक नकारात्मक घटकांनी घेरल्याने बाजार खाली येत असलेला दिसून आला. प्रारंभी मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक वाढून २५हजार ६०० पर्यंत पोहोचला होता, मात्र सप्ताहाच्या अखेरीस तो २५१०१.५१ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात १२२.६६ अंश म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३०.६५ अंश म्हणजेच ०.४१ टक्क्यांनी खाली येऊन ७५११.४५ अंशांवर विसावला. असे असले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस हे निर्देशांक अनुक्रमे ८९६१.९६(२६ अंशांची वाढ) आणि ९७६१ (८७ अंशांची वाढ) बंद झाले.इराकमधील दहशतवाद्यांना रोखण्यात नाटोने पुढाकार घेतल्याने येथील संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याने कच्च्यातेलाच्या किंमती थोड्या खाली आल्या. मात्र भारताला या किमतींमुळे चिंता वाटत आहे. या वाढीव किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव वाढून तूट वाढण्याची भीती आहे. याचा प्रभाव आगामी अर्थसंकल्पावरही पडू शकतो.दरम्यान, घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात मे महिन्यामध्ये वाढ झाली आहे. हा दर आता ६.०१ (एप्रिल महिन्यात ५.२०) टक्क्यांवर पोहोचला आहे. गेले काही महिने सातत्याने खरेदी करून भारतीय बाजार वाढवित असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मागील सप्ताहात ४०५.६७ कोटी रुपयांची विक्री केली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात आधीच्या सप्ताहापेक्षा उलाढालीचे प्रमाण कमीच राहिले.भारतामधून खनिज तेलाच्या खरेदीसाठी डॉलरची मागणी वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाले. याचा फायदा माहिती तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी आस्थापनांंना होणार असल्यामुळे त्यांचे समभाग वधारले. शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या दरवाढीचा प्रभाव बाजारावर आगामी सप्ताहात पडण्याची चिन्हे आहेत. या दरवाढीने चलनवाढीची धग वाढणार असल्याने अनेक आस्थापनांना त्याचा फटका बसू शकतो.
घसरण सुरूच; स्मॉलकॅप, मिडकॅप तेजीत
By admin | Updated: June 23, 2014 05:07 IST