Join us
Daily Top 2Weekly Top 5

एस.के. जैनविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा

By admin | Updated: April 3, 2015 23:56 IST

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी)सिंडिकेट बँकेचे माजी संचालक एस.के. जैन आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला.

नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी)सिंडिकेट बँकेचे माजी संचालक एस.के. जैन आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला. गेल्या वर्षी जैन यांना केंद्रीय गुप्तचर खात्याने लाच आणि भ्रष्टाचाराबद्दल अटक केली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. काही कंपन्यांना पत पुरवठ्याची मर्यादा वाढवून देण्यासाठी असलेली पद्धत दूर सारून जैन यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला व ५० लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल केंद्रीय गुप्तचर खात्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार (प्रथम माहिती अहवाल) दाखल केली होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन हा गुन्हा दाखल झाला आहे. जैन आणि इतरांविरुद्ध हवाला व्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत जैन यांनी कलंकित मार्गांनी मालमत्ता गोळा केल्याचे स्पष्ट झाले. जैन यांची लवकरच चौकशी केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले. सिंडिकेट बँकेकडून भूषण स्टील कंपनीने घेतलेले कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे हप्ते फेडलेले नसतानाही तेव्हा व्यवस्थापकीय संचालक असलेल्या एस. के. जैन यांनी ५० लाख रुपयांच्या बदल्यात कंपनीला पत मर्यादा (क्रेडिट लिमिट) वाढवून दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)