नवी दिल्ली : भारतात होणार्या थेट परकीय गुंतवणुकीत आतापर्यंत अव्वलस्थानी असलेल्या मॉरिशसला मागे सारत सिंगापूरने या स्थानावर कब्जा केला आहे. मागील वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिकृत सूत्रांनी जाहीर केले. सन २०१३-१४ मध्ये भारतात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे २५ टक्के गुंतवणूक एकट्या सिंगापूरने केली आहे. मागील आर्थिक वर्षात या देशाने ५.९८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. त्यापाठोपाठ मॉरिशसचा क्रमांक लागतो. त्या देशाने ४.८५ अब्ज डॉलर भारतात गुंतविले आहेत. औद्योगिक धोरण आणि विकास मंत्रालयातर्फे भारतात गतवर्षी झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर झाली आहे. मागील वर्षापर्यंत अव्वलस्थानी असणार्या मॉरिशसकडून येणारी गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. मागील वर्षात मॉरिशसने २००६-०७ पासूनची सर्वात कमी गुंतवणूक भारतात केली. तर दुसर्या बाजूला याच कालावधीत सिंगापूरने केलेली ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. भारतातील बंदरे, विमानतळ, महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत एक महापद्म अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. सन २०१३-१४ मध्ये देशात २४.३ अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली. मागील वर्षापेक्षा या गुंतवणुकीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सिंगापूर अव्वल
By admin | Updated: May 27, 2014 06:08 IST