Join us
Daily Top 2Weekly Top 5

चालू वर्षी कापूस निर्यातीत २९ टक्के घट होण्याची चिन्हे

By admin | Updated: April 22, 2015 02:49 IST

चीनकडून मागणी ओसरल्यामुळे भारताची कापूस निर्यात घटली असून आतापर्यंत केवळ ४५ लाख गाठींची निर्यात होऊ शकली,

नवी दिल्ली : चीनकडून मागणी ओसरल्यामुळे भारताची कापूस निर्यात घटली असून आतापर्यंत केवळ ४५ लाख गाठींची निर्यात होऊ शकली, अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) एका अधिकाऱ्याने दिली. सप्टेंबर महिन्यात संपणाऱ्या चालू कापूस विपणन वर्षात एकूण निर्यात गेल्या वर्षीपेक्षा २९ टक्क्यांनी घटून ७० लाख गाठी राहण्याची शक्यता आहे. भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक व निर्यातदार देश आहे. भारतातून गेल्या पीकवर्षात (आॅक्टोबर-सप्टेंबर) एकूण कापूस निर्यात ९९ लाख गाठींची होती. कोणतीही मागणी नसल्यामुळे आता कापसाची निर्यात शक्य नाही. आम्ही ४५ लाख गाठींची निर्यात केली आहे. या पीकवर्षात ७० लाखांहून अधिक गाठींची निर्यात होऊ शकेल, असे मला वाटत नाही, असे सीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कापसाची एक गाठ १७० किलोची असते. जगातील कापूस साठ्यात वाढ आणि चीनच्या मागणीत मोठी घट झाल्याचा फटका निर्यातीला बसला, असे हा अधिकारी म्हणाला. कापसाच्या उपलब्धतेत मोठी वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या किमतीवर दबाव पडला आहे. सीसीआय सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या दराने कापसाची खरेदी करते. सीसीआयने २०१४-१५ या पीकवर्षात ९० लाख गाठींच्या खरेदीचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत सीसीआयने हमीदरावर ८६.९ लाख गाठींची खरेदी केली आहे. कापूस खरेदीची प्रक्रिया जवळजवळ संपुष्टात आली आहे. आता आम्ही ई- लिलावाद्वारे कापसाची विक्री सुरू केली असून आतापर्यंत पाच लाख गाठी विकल्या आहेत. देशांतर्गत कापसाची आवक कमी होण्यासह घरगुती स्तरावर किमती वाढल्यामुळे कापूस खरेदी आता थांबविण्यात आली आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. कापसाचा भाव प्रति कँडी (एक कँडी म्हणजे २.१० गाठी) १००० ते १,५०० रु. वाढला आहे. कापूस विक्री सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला.