ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - जर तुम्ही अँड्रॉइड फोनचा वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये गुपचूपपणे तुमची माहिती चोरून ती माहिती हॅकर्सना पुरवाणारे अॅप असू शकते. धक्कादायक बाब म्हणजे असे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये प्री इन्स्टॉल असू शकतात. म्हणजेच तुमचा फोन पहिल्यांदाच स्वीच ऑन करण्यापूर्वीपासूनच हा मालवेअर (व्हायरस) तुमच्या मोबाइलमध्ये असू शकतो.
सध्या मोबाइल विक्रीमध्ये आघाडीवर असलेल्या विविध कंपन्यांच्या 30 हून अधिक स्मार्टफोन्स आमि टॅबमध्ये असा मालवेअर(व्हायरस) असल्याची समोर आले आहे. या संदर्भातील वृत्त एनबीटीमध्ये प्रकाशित झाले असून, चेक पॉइंटने आपल्या दोन काँर्पोरेट ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱ्या 38 हून अधिक स्मार्टफोन्स आणि टॅबमध्ये असा मालवेअर असल्याचे पाहिले आहे, असे या वृत्ता म्हटले आहे. या कॉर्पोरेट ग्राहकांपैकी एक टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे, तर एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. अगदी सॅमसंग, एलजी आणि गुगलसह अनेक मोठ्या मोबाइल ब्रँड्सचे फोनही या मालवेअरने प्रभावित असल्याचे समोर आले आहे.
चेक पॉइंटने या संदर्भातील आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "काही डिव्हाइसमध्ये हा मालवेअर ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वीपासूनच असल्याचे आमच्या निदर्शनास आले. विक्रेत्यांकडून देण्यात आलेल्या आरओएममध्ये हे अॅप्स नव्हते. वितरकांच्या साखळीदरम्यान कुठेतरी ते मोबाइलमध्ये अॅड करण्यात आले.
चेक पॉइंटने ज्या संशयास्पद अॅपना शोधून काढले आहे. ते अॅप्स युजर्सची वैयक्तिक माहिती चोरी करतात. त्यातील एका फोनमध्ये तर Slocker नावाचा एक रेनसमवेअर होता. रेनसमवेअर त्या अॅप्सना किंवा सॉफ्टवेअर्सना म्हटले जाते. ज्यांच्या मदतीने हॅकर्स डिव्हाइसला लॉक करतात आणि पुन्हा डिव्हाइसचा अॅक्सेस देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करतात.