Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत खदखद-

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद

सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद
-सत्तेचा मार्ग मोकळा: मात्र मंत्रिपदावरून रस्सीखेच
मुंबई- शिवसेनेला चार कॅबिनेट व आठ राज्यमंत्रीपदे देण्याची तयारी भाजपाने दाखवली असून सत्तेत सहभागी होण्यास शिवसेना जवळपास राजी झाली आहे, पण मंत्रिमंडळातील समावेशावरून शिवसेनेत असंतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्य मंत्रिमंडळात आपला समावेश होणार किंवा कसे याबाबत माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम हे साशंक असल्याने त्यांनी सत्तेतील सहभागाबाबत शिवसैनिकांचे मत अजमावून पाहण्याचा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांना वाटाघाटीत कुठेच सहभागी करून घेण्यात न आल्याने तेही नाराज झाले आहेत. शिंदे यांना चर्चेत सहभागी करून न घेता विदर्भातील दुष्काळी दौर्‍यावर धाडण्यात आले आहे. सुनील प्रभू यांच्या संभाव्य समावेशामुळे रवींद्र वायकर हे अस्वस्थ आहेत.
सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता विधान परिषदेची एक जागा शिवसेनेने भाजपाकडे मागून घेतली आहे. संभाव्य मंत्री म्हणून सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. नीलम गोर्‍हे, डॉ. दीपक सावंत या विधान परिषद सदस्यांच्याच नावाची चर्चा होत असल्यामुळे विधानसभेत दोन-तीन टर्म निवडून येणार्‍या आमदारांनी काय करायचे, अशी खदखद सेनेत व्यक्त होत आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना प्रादेशिक व जातीय समतोल विचारात न घेता केवळ मुंबईतील नेत्यांचा व आमदारांचा समावेश झाल्यास शिवसेनेत नाराजी उफाळून येईल, असे काही आमदारांचे मत आहे. मराठवाड्यातून अर्जुन खोतकर, पश्चिम महाराष्ट्रातून राजेश क्षीरसागर आणि विदर्भातून संजय राठोड यांना संधी मिळणार की नाही, अशी विचारणा होत आहे. (विशेष प्रतिनिधी)
......................................................
ऊर्जा, जलसंपदा खाती बदनामीकारक ?
ऊर्जा आणि जलसंपदा या खात्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी झाल्याने ही दोन खाती मागावी किंवा कसे याबाबत शिवसेना साशंक आहे. गृह, नगरविकास, गृहनिर्माण, महसूल व ग्रामविकास ही पाच खाती देण्यास भाजपाने नकार दिला असताना आता ऊर्जा व जलसंपदा ही दोन मोठी खाती शिवसेना मागू शकते. मात्र ऊर्जा खाते स्वीकारले तर भारनियमनामुळे आणि जलसंपदा खाते स्वीकारले तर अपूर्ण प्रकल्प व दुष्काळी परिस्थिती यामुळे बदनामी होण्याची भीती शिवसेनेला वाटते.
..........................................................
रंग भरण्याचा प्रयत्न करीत आहे- उद्धव ठाकरे
जहांगिर कला दालनात एका प्रदर्शनाच्या उदघाटनास हजर राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना वाटाघाटींबाबत विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात रंग भरण्याचा प्रयत्न करीत आहे. बघू काय चित्र तयार होते ते!
--------------------------
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असून ३ ते ४ डिसेंबर रोजी शपथविधी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
----------------------