Join us

शेअर बाजारात अडीच महिन्यांची मोठी घसरण

By admin | Updated: September 24, 2014 01:48 IST

जागतिक आर्थिक वृद्धीबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे विक्रीच्या दबावाने मंगळवारी शेअर बाजारात सेन्सेक्स ४३१ अंक व निफ्टी १२९ अंकांनी कोसळला.

मुंबई : जागतिक आर्थिक वृद्धीबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे विक्रीच्या दबावाने मंगळवारी शेअर बाजारात सेन्सेक्स ४३१ अंक व निफ्टी १२९ अंकांनी कोसळला. शेअर निर्देशांकांत गेल्या अडीच महिन्यात एका सत्रामध्ये झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे.बाजारातील जाणकारांनी सांगितले की, सप्टेंबरचे डेरिव्हेटिव्हज् करार गुरुवारी समाप्त होत आहेत. यामुळे सुरुवातीला नफेखोरीसाठीच्या विक्रीनेही देशी बाजारधारणा प्रभावित झाली. तत्पूर्वी नफेखोरीच्या विक्रीनेही बाजारधारणेवर परिणाम झाला.मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध २१०० हून अधिक शेअर्समध्ये आज घसरण नोंदली गेली. यामुळे बाजार भांडवलाच्या दृष्टीने गुंतवणूकदारांना १.६३ लाख कोटीचे नुकसान झाले. बीएसईचा ३० शेअर आधारित सेन्सेक्स सत्राच्या सुरुवातीला पाच मिनिटातच २७,२५६.८७ अंकांच्या उच्चांकावर गेला; मात्र नंतर विक्रीच्या दबावाने तो घसरणीला लागला आणि प्रमुख शेअर्समध्ये घसरणीने २७ हजाराच्या पातळीवरून खाली आला. सेन्सेक्स अखेरीस ४३१.०५ अंक वा १.५८ टक्क्यांनी कोसळून २६,७७५.६९ अंकावर बंद झाला. सेन्सेक्स यापूर्वी ८ जुलै रोजी ५१७.९७ अंकांनी कोसळला होता.तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही विक्रीच्या माऱ्याने ८,१००च्या पातळीखाली बंद झाला. निफ्टी १२८.७ अंकांनी घसरून ८,०१७.५५ अंकावर आला. निफ्टीनेही यापूर्वी ८ जुलै रोजी १६४ अंकांनी आपटी खाल्ली होती. (प्रतिनिधी)